पुणे, 24 सप्टेंबर : मागच्या दोन दिवसांपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या पुणे, बारामती दौऱ्यावर आहेत. सीतारामन यांच्यावर बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामतीमध्ये आल्या आहेत. दरम्यान त्यांनी विविध ठिकाणी भेटी देत चर्चा केली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पुणे जिल्ह्यात स्वागत कमानी लावल्या गेल्या आहेत. सातारा रस्त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानीला अज्ञात व्यक्तींनी काळे फासले आहे. धनकवडीतील अहिल्यादेवी चौकात हा प्रकार घडला.
बारामती मतदासंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार करणे व भाजपला अधिक मजबूत करण्याची जबाबदारी पक्षाने निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवली आहे. यासाठी त्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या स्वागत कमानीला काळे फासल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : निर्मला सीतारामन आणि अजितदादा आज बारामतीत आमनेसामने!
सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथील शिवछत्रपती सभागृह परिसरात आमदार भीमराव तापकीर यांच्यामार्फत गुरुवारी (दि. 22) निर्मला सीतारामन यांचे स्वागत करण्यासाठी कमान लावण्यात आली होती. या कमानीवर काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी काळे फासले. भाजपकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.
निर्मला सीतारामन काय म्हणाल्या…
मागच्या 8 वर्षांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबवल्या आहेत. त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे असल्याचे त्या म्हणाल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बावधन येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले. बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये भाजप बारामती लोकसभा मतदारसंघातील युवा, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, महिला, अल्पसंख्याक, किसान मोर्चाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
हे ही वाचा : पुण्यासह महाराष्ट्राची तीन शहरं हाय अलर्टवर, गुप्तचर यंत्रणांचा इशारा
निर्मला सीतारामन म्हणाल्या,‘ नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाकचा निर्णय बंद करून मुस्लिम महिलांवरील अन्याय दूर केला. त्यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही चांगली कामगिरी होत आहे. देशातील आठ कोटी कुटूंबांना उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर देण्यात आले आहेत. अजून एक कोटी कुटूंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, महिला अध्यक्षा कांचन कुल, आदी उपस्थित होते.