पुण्यात आज मुसळधार पाऊस पडला
पुणे, 11 सप्टेंबर : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं थैमान बघायला मिळत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी प्रचंड मुसळधार पाऊस पडला होता. या पावसाने मुंबईची लाईफलाईन असलेली लोकली ट्रेन थांबवली होती. अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबई आणि उपनगरातल्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड मोठी गर्दी जमा झालेली होती. मुंबई आणि ठाण्यात दोन दिवसांपूर्वी जसा पाऊस पडला होता अगदी तसाच पाऊस आज पुणे शहरात पडला आहे. पुण्यात आज दुपारनंतर पावसाने प्रचंड थैमान घातलं. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यामुळे सुरु झालेल्या पावसाने पुणेकरांची धडकी भरवली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. संध्याकाळी पडलेला पाऊस हा अतिशय खतरनाक होता, अशी प्रतिक्रिया काही पुणेकरांनी दिल्या आहेत. पुण्यात आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. यामध्ये चंदननगर पोलीस ठाण्याचादेखील समावेश आहे. मुसळधार पावसामुळे चंदननगर पोलीस ठाण्यात पाणी शिरलंय. पोलीस कर्मचारी बसत असलेल्या कॅबिनपर्यंत हे पाणी पोहोचलं आहे. या पाण्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संकट काळात सर्वसामान्यांसाठी धावून जाणाऱ्या पोलिसांच्या कार्यालयातच पाणी शिरल्याने पाऊस किती भयानक होता याचा प्रत्यय येतोय. चंदननगर पोलीस ठाण्यात कशाप्रकारे पाणी साचलं आहे त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
चंदननगर पोलीस ठाण्यापाठोपाठ कोथरुड कचरा डेपोमध्ये देखील प्रचंड पाणी शिरलं आहे. या कचरा डेपोतील गाड्या पाणीखाली गेल्या आहेत. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी, अशी परिस्थिती आहे.
पुण्यात आज पडलेल्या पावसाने संपू्र्ण शहराची दाणादाण उडाली आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे. पुण्यातील चंदननगर पोलीस ठाणे, कोथरुड येथील वेदभवन, वनाज जवळ कचरा डेपो, पाषाण भागातील लमाण तांडा, सोमेश्वर वाडी, वानवडीतील शितल पेट्रोल पंप परिसर, बी टी ईवडे रोड आणि कात्रज उद्यान परिसरात पावसाचं पाणी साचलं आहे. तर पाषाणमध्ये एनसीएल जवळ, कोंढवातील साळुंखे विहार आणि ज्योती हॉटेल, चव्हाणनगर आणि पुणे रेल्वे स्थानकाच्या रुबी हॉल जवळ झाडपडीच्या घटना समोर आल्या आहेत. ( महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, औरंगाबाद-सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस, कोल्हापुरातही कहर, निसर्गाच्या रौद्ररुपाचे भयंकर VIDEO समोर ) रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कात्रज धनकवडी परिसरासह पर्वती भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आहे. दरम्यान पुणे महागरपालिका, SRA आणि खासगी बांधकाम व्यावसायिक केदार असोसिएट यांच्या मनमानी कामकाजामुळें येथील 22 कुटुंबियांचा जीव धोक्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या चुकीच्या कामामुळे येथील 11 ते 12 घरांत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी करणार असून येथील नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या जीवितास धोका झाला तर स्थानिक आमदार, खासदार आणि तत्कालीन नगरसेवक, पालिका आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. रात्री पावसाचा जोर वाढल्यास तीन वर्षांपूर्वी जशी परिस्थिती झाली होती तशी स्थिती होण्याची शक्यता आहे. पुढचे चार-पाच दिवस महत्त्वाचे दरम्यान, राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून सक्रिय राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Alert Maharashtra) तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान 12 सप्टेंबरपासून निर्देशानुसार मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर कमी हवेचे दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. कोकण, मराठवाडा व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून नैऋत्येकडून तर विदर्भात आग्नेयेकडून वाऱ्याची दिशा आहे. मान्सूनची नैऋत्येकडील व बंगालच्या उपसागराकडील शाखा सक्रिय झाली आहे. नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल.