अजित पवार
पुणे, 23 सप्टेंबर : भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पुणे जिल्ह्यात जोरदार दौरा सुरू केला आहे. याच दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याने त्यांच्या मनातील खदखद समोर आली आहे. काय म्हणाले अजित पवार? विरोधीपक्ष नेते अजित पवार सध्या पुणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघात फिरत आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुरू केलं आहे. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी गृहमंत्रीपद हवं असल्याचं म्हटलं आहे. आपल्या मनातली खदखद कार्यकर्त्यांसमोर त्यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हंटल होतं. मागे अनिलराव (देशमुख) नंतर म्हटल मला गृहमंत्रीपद द्या तरी पण दिलं नाही, वळसे पाटलांना दिलं. वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही( हशा पिकला). वाचा - निर्मला सीतारामन पवारांच्या बालेकिल्ल्यात, ‘मिशन बारामती’साठी आलेल्या अर्थमंत्री पहिल्याच दिवशी भडकल्या मी पक्ष संघटन मजबूत करायला आले : निर्मला सीतारामन बारामती मतदारसंघाच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी निर्मला सीतारामन या पत्रकार परिषदेत संवाद साधत होत्या, पण या पत्रकार परिषदेत वारंवार लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात येत असल्यामुळे सीतारामन भडकल्या. मी पक्ष संघटन मजबूत करायला आले आहे. सतत लोकसभा निवडणुकींवर प्रश्न विचारू नका, असं निर्मला सीतारामन पत्रकारांना म्हणाल्या. ‘मी भाजपची संघटना मजबूत करायला आली आहे. कुठल्या परिवाराबद्दल बोलायला आली नाही. भारतात सगळ्या लोकसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. इडी ही स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या कामकाजात आम्ही दखल देत नाही. इडीची कामाची पद्धत वेगळी आहे,’ असं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलं. ‘महागाई वाढली हे मान्य नाही, याबाबत मी सभागृहात उत्तर दिलं आहे. सगळ्या जगात काय सुरू आहे ते पाहा. अमेरिकेत 40 वर्षात नव्हती तेवढी महागाई आहे. जर्मनीत 30 टक्के महागाई आहे. आपल्याकडे फक्त 2 टक्क्यांपर्यंत महागाई वाढली आहे, ती नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करतोय,’ असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.