प्रातिनिधिक फोटो
रत्नगिरी, 15 जून : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन देशात मुस्लीम समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने झाली. या दरम्यान काही आंदोलनाला गालबोटही लागलं. विशेष म्हणजे गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या आंदोलानाचा फायदा घेऊन काही समाजकंटकांचा देशात घातपात घडवून आणण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी 29 जूनपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. याबाबत पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. रत्नागिरी पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलंय? भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी 26 मे रोजी एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याने आणि नवीन जिंदाल यांनी त्यासंबंधी ट्वीट केल्याने त्याचे पडसाद संपूर्ण भारत आणि जगभरातील मुस्लीम राष्ट्रांमध्ये उमटले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ 10 जूनला काही मुस्लीम संघटनांकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. 10 जूनला काही मुस्लीम संघटनांकडून राज्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करुन मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आता रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्याच्या निषेध व्यक्त करुन कडक कारवाई करण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यास निवेदन प्राप्त झाले आहेत. ( विधान परिषदेतला पराभव टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी ) सद्यस्थितीत देशात तसेच राज्यात धार्मिक तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात दोन समुदायाचे लोक एकत्र आल्यास त्यादरम्यान या कारणावरुन त्यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या तणावाच्या अनुषंगाने मागील काही दिवसांत देशातील काही राज्यात दंगलीचे प्रसंग घडले आहेत. या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटक गैरफायदा घेऊन आपले हित साधण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच पुढील महिन्यात बकरी ईद हा सण साजरा होत आहे. त्या पार्श्वभूीवर सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 15 जून दुपारी एक वाजेपासून ते 29 जूनच्या रात्री बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 37(1)(3) प्रमाणे मनाई आदेश जारी करण्याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. जमावबंदी दरम्यान ‘या’ गोष्टींना बंदी 1) शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूरे, लाठ्या किंवा कोणतीही वस्तू घेवून फिरण्यास मनाई असेल. 2) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोट पदार्थ घेऊन फिरू नये. 3) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे या गोष्टींना बंदी असेल. 4) सभ्यता अगत निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषण करण्यास मनाई असेल. 5) सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे किंवा वाद्य वाजवण्यास बंदी बसेल. 6) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्सास मनाई आहे. 7) जमावबंदीचे हे नियम अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मतारी, सार्वजनिक करमणुकीचे सिनेमागृह, रंगमंच इत्यादींसाठी लागू राहणार नाहीत. 8) प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरणुका तसेच सभेचे आयोजन करायचे असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहील.