मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; वादळीवाऱ्यात झाड कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
वाशिम, 21 मे : वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (pre monsoon shower in Washim) पडला. या मान्सूनपूर्व पावसामुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं असून पिंपळाचे झाड उन्मळून अंगावर पडल्याने एका 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला (5 year old child died), तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना मानोरा तालुक्यातील शेंदोणा इथं आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली. शेंदोणा इथं आज पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला दरम्यान गावातील मारूती मंदिरा जवळील पिंपळाचे झाड उन्मळून ते घराबाहेर अंगणात खाटेवर झोपलेल्या नयन सातपुते आणि वसुदेव सातपुते यांच्या अंगावर पडले. यामध्ये नयन सातपुते या 5 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर वसुदेव सातपुते हे गंभीर जखमी झालेत. तसेच परिसरातील मंदा भोरकडे ही महिला अंगावर झाड पडल्याने जखमी झाली आहे. वाचा : सांगलीत गुड्डापूर मंदिर परिसरात गुडघाभर पाणी, रस्ते पाण्याखाली, VIDEO नयन सातपुते याच्या मृत्यूमुळे कुटुंबासह गावामध्ये शोककळा पसरली आहे. हे पिंपळाचे झाड उन्मळून पडल्याने अनेक घरांसह घरातील साहित्याच ही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे परिसरातील घरांवरील टिन पत्रे उडून मोठं नुकसान झालं असून वीज तारा तुटल्याने पुरवठा ही खंडित झाला आहे. वाचा : दक्षिण महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार Pre-Monsoon, मुंबई-पुण्यात काय अंदाज? वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मालेगांव, शिरपूर,वाशिम,मानोरा तालुक्यातील उमरी शेंदोणासह अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडला. या पावसामुळे काही ठिकाणी उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मानोरा तालुक्यातील उमरी शेंदोणासह काही गावामध्ये मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर घरावरील टिन पत्रे उडून गेल्यानं अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत. अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळं ग्रामस्थांमध्ये एकच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने ज्या ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघडयावर आलेत त्यांचे पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. ज्यामुळे उघडयावर आलेले संसार पुन्हा उभारता येतील.