JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'वाईन'वरुन राजकीय धुमशान, प्रवीण दरेकर ते नाना पटोले, आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या

'वाईन'वरुन राजकीय धुमशान, प्रवीण दरेकर ते नाना पटोले, आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या

“काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कार्यकर्ते जगवायचे आहेत. त्यासाठी जनता मेली तरी चालेल”, अशा तिखट शब्दांत प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उत्तर दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जानेवारी : राज्य सरकारने (Maharashtra Government) वाईन (Wine) मोठ्या शॉपी, मॉल किराणा दुकानांमध्ये विकण्यास परवानगी दिल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलेलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी याच मुद्द्यावरुन काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) सडकून टीका केली आहे. “राज्यात 90 टक्के देशी दारुची दुकानं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहेत”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कार्यकर्ते जगवायचे आहेत. त्यासाठी जनता मेली तरी चालेल”, अशा तिखट शब्दांत प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना उत्तर दिलं आहे. प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले? “देशी दारुची कधीपासून दुकानं आली, गावात कुणाची दुकानं आहेत, कोणती कार्यकर्ते देशी दारुची दुकानं चालवतात? सरकार तुमचं आहे. सर्व लेखाजोखा महाराष्ट्राच्या जनतसमोर येऊ द्या. केवळ बोलायचं, त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. राज्यात 90 टक्के देशी दारुची दुकानं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची, पुढाऱ्यांची आहेत. तशाचप्रकारे आता वाईन शॉप काढणार आहेत. आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी त्यांना लावायची आहे. आपला कार्यकर्ता जगला पाहिजे, लोकं मेली तरी चालतील, अशा भावनेतून वागणाऱ्या नेत्यांकडून काय अपेक्षा करु शकतो”, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे. ( ‘पहिल्या पत्नीकडून तीन मुलं, निवडणुकीसाठी बायको पाहिजे’ची बॅनरबाजी, भाजपची महिला आघाडी आक्रमक ) ‘हा निर्णय शेतकऱ्यांसाठी, सरकारला फार महसूल मिळणार नाही’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “चंद्रपूरला ज्यावेळी दारुबंदी झाली त्यावेळी तेथील दारुचे दुकानं स्थलांतरित करण्याचं काम भाजपने केलं. राज्य सरकारने जाणीव ठेवून निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर या निर्णयाचं स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची याबाबत मागणी असायची. वाईन विकल्या जात नसल्याने कंपन्या द्राक्ष घेत नाही. त्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे, असं शेतकरी सांगत होते. शेतकऱ्यांना त्यातून मदत होत असेल तर चांगली गोष्ट आहे. सरकारला या निर्णयातून फार महसूल मिळेल, असंही नाही. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी भूमिका माणिकराव ठाकरे यांनी मांडली. ‘मद्यपानाला आरोग्य विभाग कधीच प्रोत्साहन देऊ शकत नाही’ दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यपानाला आरोग्य विभाग कधीच प्रोत्साहन देणार नाही, अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली. “वाईन उद्योगाला खऱ्या अर्थाने, ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मद्यपानाला प्रोत्साहन देणारा नाही. मद्यपानाला आरोग्य विभाग कधीच प्रोत्साहन देऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपला बोलायचा अधिकार राहिलेला नाही. ज्या भाजपने गेल्या पाच वर्षात राज्यामध्ये देशी दारुच्या दुकानांची वाढ केली, बिअर शॉपी किराणा दुकानांमध्ये उघडली. आघाडी सरकारने बंद केलेले डान्स बार चालू करण्याची व्यवस्था भाजपने केली. अशा भाजपला सुसंस्कृत भाजप बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आदेशानुसार निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या