रायगड, 06 जुलै : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातही पेण, पनवेल आणि उरण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत (Raigad rain update) आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कालपासून पडत असलेला पाऊस अजूनही बरसतोय. काळे ढग आणि पावसामुळे संपूर्ण वातावरण अंधारमय दिसत आहे. पेण, पनवेल आणि उरण या तिन्ही तालुक्यातील भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती या पावसामुळे निर्माण झाली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास भातशेतीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूर परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी पुढचे 48 तास पाऊस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 3 ते 4 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.