मुंबई, 17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृती दिन आहे. आज सकाळ पासूनच छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शक्तीस्थळावर हजारोंच्या संखेने शिवसैनिक, शिवसेना नेते, आमदार आणि खासदार शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आले होते. मात्र महाविकास आघाडीतील नेते, आमदार आणि खासदारांनी मात्र शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येणे टाळल्याचं दिसून आलंय. आज सकाळपासून शक्तीस्थळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे एकही प्रतिनिधी आलेले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे गेले होते. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वेळ मिळाला नाही. महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांच्या या वृतीने शिवसैनिकाही नाराज असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. महाविकासआघाडीचे नेते स्मृतीस्थळावर दर्शन घ्यायला आले नसले तरी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करून आलं, तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.