मुंबई, 13 जानेवारी : पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले आहे. त्यांनी ट्विट करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली. त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या सर्व घडमोडीनंतर महाविकास आघाडींच्या नेत्यांकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. नेमकं काय म्हटलं वळसे पाटील यांनी? नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीवरून ज्या काही घडामोडी घडल्या त्यावरून दिलीप वळसे पाटील यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?’ असं ट्विट वळसे पाटील यांनी केलं आहे.
नाना पटोलेंचा निशाणा दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपला आज दुसऱ्याचं घर फोडताना आनंद होत आहे. मात्र जेव्हा त्यांचं घर फुटेल तेव्हा दुसऱ्याचं घर फोडल्याचं दु:ख काय असंत याची जाणीव त्यांना होईल असं पटोले यांनी म्हटलं आहे. तसचं काँग्रेस बंडखोरांना कधीही पाठिंबा देणार नाही, त्यामुळे आम्ही सत्यजित तांबे यांना समर्थन देणार नसल्याचं देखील पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.