मुंबई, 24 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असून शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, असं स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मांडलेली भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ‘काळजी करण्याचं कारण नाही. सगळं काही ठिक आहे. फक्त थोड्या संयमाची गरज आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच मी राष्ट्रवादीत असून यापुढेही कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे. शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादी युती महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देऊ. हे सरकार राज्याच्या विकासाठी कटिबद्ध असेल,’ असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवार निर्णयावर ठाम राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याबद्दल आता अजित पवार यांनी मोदींचे आभार मानले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले आभार. महाराष्ट्रात स्थिर सरकार कायम ठेवून आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करू,’ असा विश्वास ट्विट करून अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिला आहे. अजित पवार यांनी नरेंद्र मोदींसह त्यांना शुभेच्छा दिलेल्या सर्वच भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतरही अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अडीच तास आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन तास अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मात्र हे दोन्ही नेते नेते कुठलीही प्रतिक्रिया न देता बाहेर पडले. याचा अर्थ अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी हे दोन्ही नेते अपयशी ठरले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीतून जर काही सकारात्मक चर्चा झाली असली तर त्याच्याबद्दल तसं वक्तव्य राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांकडे केलं असतं. या बैठकीला जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार परत आले असून अजित पवार एकटे पडू नये याकरता आम्ही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांची शिष्टाई अपयशी ठरली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता या भेटीचा वृत्तांत हे दोघेही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याची माहिती कळते आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र वेगळी भूमिका घेत बंडखोरी केली. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही उरकला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. मात्र असं असलं तरीही शरद पवार यांच्याकडून अजूनही डॅमेज कण्ट्रोलसाठी प्रयत्न सुरू आहेत. अजित पवारांचं मन वळवून भाजपचं सरकार उलथून टाकण्यासाठी शरद पवार यांनी आपलं विश्वासू अस्त्र बाहेर काढलं. अजित पवारांची पुन्हा घरवापसी करण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत बैठकीसाठी गेले होते. अजित पवार यांचं मन वळवून त्यांना पुन्हा राष्ट्रवादीसोबत आणण्यात दिलीप वळसे पाटील यांना यश आल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात.