नाशिक, 30 जानेवारी : आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी मतदान होत आहे. ही निवडणूक चागलीच चर्चेत आली आहे. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पक्षादेश डावलल्यानं सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसनं कारवाई केली तर सत्याजित तांबे यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानं भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिकाच जाहीर केली नाही. भाजप नेत्यांकडून तांबेंचं समर्थन मात्र ऐन मतदानाच्या एक, दोन दिवस आधी उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचं समर्थन करण्यात आलं. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचं समर्थ केलं. आपले कार्यकर्ते हे सत्यजित तांबे यांनाच मतदान करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुधीर तांबे हे आज मतदान करण्यासाठी आले असता त्यांना भाजपच्या पाठिंब्याबाबत विचारण्यात आले, मात्र त्यांनी यावर बोलंण टाळलं. हेही वाचा : MLC Election : सत्यजीत तांबेंसाठी घडणार का चमत्कार? आज महत्त्वाचा दिवस नेमकं काय म्हणाले तांबे सुधीर तांबे यांना भाजपच्या पाठिंब्याबाबत विचारले असता त्यांनी फक्त हसून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर बोलणं टाळलं. मात्र मी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा मला सर्व पक्षांची साथ लाभली. आज सत्यजित तांबे यांनाही सर्व पक्षाची मदत होईल, आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.