नाशिक, 9 जुलै : नाशिक शहराची ओळख ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून तर आहेच. पण या शहरासोबतच जिल्ह्यातही अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकीच एक शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेला रामशेज किल्ला. (Ramshej fort) नाशिक शहराच्या उत्तरेला 14 किलोमीटर अंतरावर नाशिक पेठ महामार्गावर आहे. या किल्ल्याबद्दल एक आख्यायिका आहे की श्रीराम श्रीलंकेत जात असताना ते येथे काही काळ राहिले. (History of ramshej fort) चला तर आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया… रामशेज किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे दऱ्याखोऱ्यांत, जंगलात अथवा खूप उंचीवर नाहीये. एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर हा किल्ला आहे. समुद्र सपाटी पासून 3 हजार 200 फूट उंचीवर हा किल्ला आहे. दररोज अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. किल्ल्यावर जाण्यासाठी पायी वाट आहे. मध्येच चढ उतार मध्येच पायऱ्या आहेत. मोठे मोठे दगड ही आहेत. मात्र, पायीवाट असल्याने किल्ला चढण्यासाठी जास्त काही त्रास होत नाही. काही ठिकाणी अगदी संभाळून चढाव लागते,अन्यथा पाय जर घसरलातर दुर्घटना होण्याची देखील शक्यता असते. किल्ल्याच्या नावाचा इतिहास किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहचताच आपल्याला प्रभू श्री रामांच दर्शन होत. या मंदिरात राम,सीता आणि लक्ष्मण यांच्या तीन मूर्ती आहेत. तर बाजूलाच हनुमानाची देखील मूर्ती आहे. इथेच प्रभू श्री रामचंद्रांनी वनवास काळात बंधू लक्ष्मणासोबत विश्रांती घेतल्याची अख्यायिका आहे. त्यावरूनच या किल्ल्याला रामशेज असे नाव पडल्याची इतिहासात नोंद आहे. रामशेज किल्ला अतिशय रुबाबदार असून गडावर फिरण्यासाठी अनेक पायवाटा दिसून येतात. गडावर तटबंदी आहे. तटबंदीच्या आतील बाजूस खंदक व पायऱ्या आहेत. तटबंदीच्या बाजूने चालत असताना आपल्याला गडाचा वैशिष्ट्ये पूर्ण दरवाजा दिसतो. दरवाजा जमिनीखाली असून दगडातच कोरीव पायऱ्या कोरलेल्या आहेत. दोन्ही साईटची भिंती तासून एकसमान केलेली आहे. याच दरवाज्याच्या पलीकडे चुण्याचा घाणा व पाच पाण्यांच्या टाक्यांचा समुह आहे. बाजूलाच छोटा कमानी दरवाजा दिसून येतो. यात खाली उतरायला पायऱ्या आहेत. दरवाज्यातून खाली खांब टाके आहे. किल्ल्याच्या पठारावर हे कोरीव पाण्याचे टाके आहेत. हे पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जात असल्याचे सांगितले जाते. वाचा :
‘आमच्या कुटुंब प्रमुखाबद्दल कोणी वाईट बोलू नये’; शिंदे गटाच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे किल्याच्या वरच्या बाजूला सैनिकांचे जोते आहेत. किल्ल्यावर देवीचे छोटेखानी मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला ही पाण्याच्या तीन टाक्या आहेत. किल्याच्या दिंडोरी बाजूच्या शेवटच्या टोकाला एक चोर दरवाजा आहे. याच चोर दरवाज्याने मराठा सैन्याला रसद पुरवठा होत असल्याचे म्हटले जाते. हा दरवाजा जमीनी खाली असून आत मध्ये दोन कमानी आहेत. हा चोर दरवाजा सहज कोणाच्या नजरेस पडत नाही. देवीच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे. पर्यटक किल्ल्यावर आल्यानंतर पहिले छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन जयघोष करतात. रामशेज किल्ल्यावरून दुरवर मोकळा प्रदेश दिसतो. देहेरगड,भोरगड आणि त्र्यंबकगड यांचे दर्शन होते. इतिहास अभ्यासक काय सांगतात “हा किल्ला मराठ्यांनी मुघलांविरुद्ध साडे सहा वर्षे लढवल्याची इतिहासात नोंद आहे. अनेक वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मिळवण्यासाठी औरंगजेबाच्या सैन्याने चाल केली होती” असे इतिहास अभ्यासक राम खुर्दळ सांगतात. वाचा :
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
गुगल मॅपवरून साभार…
कसे पोहोचाल किल्ल्या पर्यंत?
नाशिक शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर नाशिक पेठ महामार्गावरील आशेवाडी या गावातून किल्ल्यावर पोहोचता येते. सार्वजनिक वाहतूक वापरणार असाल तर या रस्त्यावर बस वाहतूक तसेच खाजगी रिक्षा धावते त्याने ही गडावर जाऊ शकता. तुम्ही पुण्यातून येणार असाल, तर 226 किलोमीटर अंतरावर असून 5 तास 31 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. मुंबईवरून येणार असाल तर 184 किलोमीटर अंतरावर असून 4 तास 22 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. हा किल्ला बघण्यासाठी प्रवेश शुल्क नाहीये. तसेच वेळेचे देखील बंधन नाही. आपण कधी ही किल्ला बघण्यासाठी जाऊ शकता. पर्यटकांनी काय काळजी घ्यावी किल्ला पाहण्यासाठी वर्षेभरात केव्हाही जाऊ शकता. पावसाळ्यात मात्र येथील सौंदर्य काही औरच असते. किल्ला चढताना सावकाश चढावा,सोबत काठी असू द्यावी,गडावर चहा नाष्टाची सोय नाही. त्यामुळे खाण्यासाठी तुम्हाला शहरातूनच घेऊन जावे लागेल. गड दोन तासांमध्ये पुर्ण पाहून होतो. गडावर देवीच्या मंदिरात मुक्कामाची सोय होऊ शकते.