नागपूर, 19 जून : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यामागे ईडीचा (ED) ससेमिरा लागलेला आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली गेली. या दरम्यान त्यांनी आपली आई म्हणजेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती बरी नसल्याचं कारण देत चौकशीपासून एक दिवसाची सुट्टी मागितली होती. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना तीन दिवसांची मुदतवाढ दिली होती. ईडीकडून राहुल गांधी यांना उद्या म्हणजे सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत उद्या मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसकडून (Congress) युथ काँग्रेसच्या (Youth Congress) पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना उद्या दिल्लीला (Delhi) बोलावण्यात आलं. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरुन देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलने केली जात आहे. आता काँग्रेसने युथ काँग्रेसच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्या दिल्लीत आंदोलनासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या देशभरातून तब्बल 40 हजारापेक्षा जास्त युथ काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या दिल्लीत काहीतरी मोठं होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. ( विधान परिषदेच्या निवडणुकीचा ‘असा’ आहे नंबर गेम, भाजप पुन्हा चमत्कार घडवणार? ) राहुल गांधी यांची चौकशी नेमकी का? राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. काँग्रेसने 1938 मध्ये असोसिएट जर्नल्स लिमिटेडची (AJL)स्थापना केली. असोसिएट जर्नल्स लिमिटेड अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आहे. AJL वर 90 कोटींहून अधिक कर्ज घेतले. 90 कोटी कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना केली. यंग इंडिया लिमिटेडमध्ये राहुल, सोनियांची हिस्सेदारी 38-38 टक्के आहे. एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले. शेअर्सच्या बदल्यात यंग इंडिया एजेएलचं कर्ज फेडणार आहे. देशातील मोक्याच्या जागांवर कमी किंमतीत ऑफिससाठी जागा आहे. मुंबई, दिल्ली शहरातील मोक्याच्या जागांचं भाडं AJLला मिळत होतं. या जागांचे मूल्य 2 हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली. 50 लाखांच्या मोबदल्यात यंग इंडिया कंपनी 2 हजार कोटींची मालक झाले. याबद्दल सोनिया गांधी, राहुल गांधींविरोधात सुब्रह्मण्यम स्वामींचा खटला दाखल केला. गांधी कुटुंबाकडून नॅशनल हेराल्डच्या संपत्तीच्या गैरवापराचा आरोप केला गेला. मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबेस सॅम पित्रोदाही आरोपी आहेत. 26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडून समन्स जारी केला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. 19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पटियाला कोर्टाकडून सर्व आरोपींना जामीन मिळाला. फेब्रुवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने आरोपींविरोधातील कारवाई रद्द करण्याची याचिका फेटाळली. मे 2019 मध्ये, ईडीने 64 कोटींची मालमत्ता जप्त केली. ईडीने 1 जून 2022 चौकशीसाठी सोनिया, राहुल गांधींना समन्स बजावला. त्यानंतर आता राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे.