प्रतिकात्मक फोटो
नागपूर, 13 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यात आता नागपूर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेरोजगारीला कंटाळून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. गळफास घेत या तरुणाने आत्महत्या केली. ऋषिकेश उर्फ ऋषी रवि मडावी (वय-19, रा. वैभवनगर, गिट्टीखदान) असे या तरुणाचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - सीताबाई यांचा मुलगा व सून यांचे दोन वर्षांअगोदर निधन झाले होते. त्यानंतर त्या आपल्या नातू ऋषीसोबत राहायच्या. मात्र, आता नातूदेखील गेल्याने त्या एकट्या पडल्या आहेत. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याने त्याच्या आजीसमोरच गळफास घेतलेल्या अवस्थेत अखेरचा श्वास घेतला. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या आई वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याला एक बहीण आणि आजी आहे. त्याची बहीण ही मामाच्या घरी राहते. तर मृत तरुण हा आपल्या 72 वर्षीय आजीसोबत राहायचा. आजी सीताबाई यांना मिळणाऱ्या पेन्शनवर त्यांचे घर चालायचे. दरम्यान, ऋषी हा कामाच्या शोधात होता. मात्र, त्याला काम मिळत नव्हते. दहा दिवसांपूर्वी त्याचा वस्तीत वाद झाला होता. तसेच त्याने या घटनेनंतर दुचाकी पेटवून दिली होती. यातच आता शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली. ऋषी हा गळफास लावत असताना त्याच्या आजीला टेबल पडण्याचा आवाज आला. त्यांनी मुख्य दरवाजा उघडून बाहेर पाहिले. त्यानंतर त्या आत आल्या तर त्यांना ऋषी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तो तडफडत होता आणि शेवटच्या घटका मोजत होता. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलविले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा - लोकार्पणाच्या 24 तासांमध्येच समृद्धी महामार्गावर अपघात, दोन कारची जोरदार धडक याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्यांना घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली आहे. त्याने व्यथित होऊन आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.