मुंबई, 07 जानेवारी : मागच्या दोन दिवसांपूर्वी वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने राज्यातील विजेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन थांबवण्यात आले व तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. संप मिटल्यानंतर पुढच्या दोन दिवसांत वीज कंपन्यांकडून ग्राहकांना दणका बसण्याची शक्यता आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे वीज दरवाढीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. यामुळे घरगुती आणि औद्योगीक वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे.
महानिर्मिती आणि महापारेषणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दरवाढीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचीकेत प्रतियुनिट 1 रुपये 35 पैसे अशी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. याचबरोबर महावितरणनेही दरवाढीसाठी याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना मार्च महिन्यापर्यंत दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचे आरोप चुकीचे, राज्य महिला आयोगानेच धाडली उलट नोटीस
‘एमईआरसी’ने 30 मार्च 2020 रोजी मार्च 2025 अखेरपर्यंत अशा पाच वर्षांसाठी वीज दरनिश्चिती आदेश जाहीर केला होता. पण कायद्यातील तरतुदीनुसार तिसऱ्या वर्षी वीज कंपन्यांना फेरआढावा याचिका दाखल करता येते. त्यानुसार महानिर्मिती आणि महापारेषणने फेरआढावा याचिका दाखल केल्या आहेत.
महानिर्मिती कंपनीने मागील 4 वर्षांतील जादा खर्च व येणाऱ्या दोन वर्षांतील अपेक्षित जादा खर्च यासाठी पूर्वी आयोगाने मंजूर रकमेव्यतिरिक्त केलेल्या एकूण 24 हजार 832 कोटींच्या अतिरिक्त वाढीची मागणी केली आहे. याचा ग्राहकांवरील सरासरी परिणाम आगामी दोन वर्षांमध्ये वसुली केल्यास 1.03 रुपये प्रतियुनिट याप्रमाणे होणार आहे.
महापारेषणने खर्चातील वाढ व पुढील दोन वर्षांतील जादा खर्च यासाठी एकूण फरकासाठी 7 हजार 818 कोटींची वाढीव मागणी केली आहे. त्यानुसार आगामी दोन वर्षांमध्ये वसुली केल्यास सरासरी 32 पैसे प्रतियुनिट याप्रमाणे वाढ होण्याची शक्यता आहे. या दोन कंपन्यांची एकूण दरवाढ मागणी 1.35 रुपये प्रतियुनिट याप्रमाणे आहे.
हे ही वाचा : गिरीश महाजन यांच्या जाहीर माफीनाम्यानंतर अजित पवारांचीही दिलगिरी; काय आहे प्रकरण?
महावितरणची मागणी यापेक्षाही अधिक असणार आहे. तिन्ही कंपन्यांची मागणी विचारात घेतल्यास प्रचंड दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. मार्च 2025 ‘पर्यंत सरासरी वीज देयक दर 7.27 रुपये प्रतियुनिट दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये तीनच वर्षांत इतका प्रचंड बोजा पडणार असेल; तर सर्वसामान्य वीज ग्राहकांना वीज वापरणेही परवडणार नाही, असे स्पष्ट होत आहे.