मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी
मुंबई, 23 सप्टेंबर : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. मुंबईत रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. रिक्षा, टॅक्सी युनियनच्या वतीने नुकतंच भाडेवाढीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने भाडेवाढीची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे येत्या 1 ऑक्टोबरपासून मुंबईकरांना टॅक्सीसाठी 3 रुपये आणि रिक्षासाठी 2 रुपयांनी भाडेवाढ आकारली जाईल. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. रिक्षाचं 21 रुपयांचं मीटर दोन रुपयांनी वाढल्यामुळे मुंबईकरांना 23 रुपये मोजावे लागतील. तर टॅक्सीचं 25 रुपयांचं मीटर आणखी तीन रुपयांनी वाढेल. मुंबईत ज्या प्रकारे लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते, त्याचप्रमाणे महानगराच्या रस्त्यांवर धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. मुंबईतील टॅक्सी युनियनने भाड्यात 10 रुपयांची म्हणजेच किमान 25 रुपयांवरून 35 रुपयांपर्यंत वाढ करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी, काही ऑटोरिक्षा संघटनांनी सांगितले की, ते देखील सरकारच्या भाडेवाढीची वाट पाहत आहे. जर निर्णय झाला नाही तर ते देखील टॅक्सींच्या संपाला पाठिंबा देऊ शकतात. ऑटो युनियन किमान भाड्यात 3 रुपये वाढीची अपेक्षा केली होती. म्हणजे रु. 21 रुपयांपासून 24 रुपयांपर्यंत. अखेर याबद्दलच्या निर्णयाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ( मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गट आता थेट सुप्रीम कोर्टात जाणार? ) टॅक्सी युनियनचे नेते एएल क्वाड्रोस यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “याची खूप गरज आहे. कारण 2021 मध्ये शेवटच्या वेळी भाड्यात सुधारणा केल्यानंतर, सीएनजीचा दर 48 रुपयांवरून 80 रुपयांपर्यंत वाढला आहे. खटुआ समितीने सरकारला शिफारस केली होती की पूर्वीच्या भाड्यात सुधारणा केल्यानंतर सीएनजी 25% पेक्षा जास्त वाढल्यास, टॅक्सी भाड्यात त्वरित सुधारणा करावी. भाडेवाढीची आमची मागणी रास्त आहे. जड इंधन आणि देखभाल खर्चामुळे कॅबला दिवसाला 300 रुपयांचे नुकसान होतंय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.