मुंबई, 25 फेब्रुवारी : “युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही देश सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, ग्रामपंचात, स्थानिक निवडणुका सगळंच तुम्हाला पाहिजे. मग आम्ही धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहाता यावं, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली”,असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारलं. दैनिक लोकसत्ताच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सडेतोड मत व्यक्त केलं. मी पुन्हा येईन असं सांगून न येणं फार वाईट असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच सत्ता मिळवा पण लोकशाही मार्गानं असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला.
ईडीच्या छापेमारीबाबत मुख्यमंत्री रोखठोक… उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईवरून संतप्त सवाल केला. “बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यांत या केंद्रीय तपास यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. तिथे बंदरावर किती मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ सापडले होते. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो.
आपली तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजा वृंदावनची संस्कृती रुजलीये, गांजाची शेती होतेय असं चित्र उभं करायचं. महाराष्ट्रात भ्रष्टाचार सुरू आहे, महाराष्ट्रात गांजाची शेती फुललेली आहे, घराघरात टेरेसमध्ये गांजाच गांजा आहे असं म्हणून महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.