मुंबई, 09 ऑक्टोंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल जर सोशल मीडियावर अपशब्द वापराल तर तुमची रवानगी आता थेट जेल मध्ये होईल. होय डोंबिवलीच्या शहापूरमधील 8 शिवसैनिकांवर पोलिसांमार्फत अशी कारवाई करण्यात आली आहे. त्यामधील 4 शिवसैनिकांची 14 ऑक्टोंबरपर्यंत थेट आधरवाडी जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर चार सैनिकांची वैयक्तीक जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
मागच्या दोन दिवसांपूर्वी शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी जात असताना शिवसैकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दिलेल्या घोषणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर शिंदे समर्थकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली असल्याने पोलिसांनी केली शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा : ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर..’; सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, ‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’
उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना विभाग प्रमुख दीपक लकडे, रवींद्र खाडे, दीपक रसाळ, हरी सोनू गबाळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना न्यायाल्यात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना जामीन न दिल्याने त्याची रवानगी थेट आधरवाडी जेलमध्ये झाली आहे.
अशाच प्रकारची एक तक्रार शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दाखल केली आहे. त्यामध्ये आरोपी असलेले कट्टर शिवसैनिक माजी उपसभापती नयन फर्डे, गोठेघर उपसरपंच अतिशय अधिकारी, उपतालुका प्रमुख सुरेंद्र तेलवणे, निलेश देशमुख यांची मात्र न्यायालयाने वैयक्तीक जामिनावर सुटका केली आहे. शहापूर पोलिसांच्यावतीने उद्या (दि.10) सोमवारी आणखी काही शिवसैनिकांवर कारवाई होण्याची शक्यता असून त्यामध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा : ना शिवसेनेचं नाव, ना धनुष्यबाण, ठाकरे-शिंदेंसाठी आता पुढे पर्याय काय?
मुख्यमंत्री या घटनात्मक पदाबद्दल अपशब्द वापरणे गैर असले तरी तसे कारण पोलिसांनी न दाखवता ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण दाखवत कारवाई केली असल्याचे दाखवले आहे. यातून वाद होण्याची शक्यता आहे. या घटनेने शहापूर मध्ये तणावपूर्ण शांतता असली तरी ठाकरे गट आणि शिंदे समर्थक यामध्ये ठिणगी पडली असून याचे पडसाद उमटू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.