पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली
मुंबई, 18 ऑक्टोबर : ‘अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे. आणखी बरेच पोळायचे आणि भाजायचे बाकी आहे. उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात अनेक गफलती समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. या धोकादायक वळणावर भाजप आणि मिंधे गटाच्या गाडीस अपघात होणारच होता. त्या धोक्यातून सुटका करून घ्यायची म्हणून अचानक गाडीस ब्रेक मारून भाजपने ‘यू टर्न’ घेतला’ असं म्हणत शिवसेनेनं बाळासाहेबांची शिवसेना या गटावर जोरदार हल्लाबोल केला. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गट, भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये जोरदार धुमशान पाहण्यास मिळाले. अखेरीस भाजपने या निवडणुकीतून नाट्यमयरित्या माघार घेतली. या घडामोडीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
‘शरद पवारांपासून राज ठाकरे यांनी फडणवीसांना विनम्र आवाहन केले व शेवटी भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करून अंधेरीतील उमेदवार मागे घेतला. अर्थात भाजपचे माघारी नाटय़ हे दिसते तसे सरळ नाही. पराभव झाला तर सरकारला मोठी किंमत चुकवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले असावे आणि शिवसेनेची मशाल जिंकणारच आहे याची खात्री भाजपला पटली असावी. शिवसेनेची ही ‘भडकलेली मशाल’ बेइमानीचे इमले जाळून टाकेल. त्यापेक्षा आता माघार घ्यावी हेच बरे, हा सुज्ञ विचार भाजप व मिंधे सरकारने केलेला दिसतो दुसरे म्हणजे भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात अनेक गफलती समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. या धोकादायक वळणावर भाजप आणि मिंधे गटाच्या गाडीस अपघात होणारच होता. त्या धोक्यातून सुटका करून घ्यायची म्हणून अचानक गाडीस ब्रेक मारून भाजपने ‘यू टर्न’ घेतला. तरी या निर्णयाबद्दल आम्ही संबंधितांचे आभार मानीत आहोत’ असं म्हणत शिवसेनेच्या अग्रलेखातून बऱ्याच दिवसांनी राज ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला आहे. (Andheri East Bypoll : एक आमदार वाढणार, तरीही नो कमेंट! उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय?) ‘भाजप… कारस्थानी आनंदीबाई… माफ करा, कमळाबाईंनी बेइमान ‘मिंधे’ गटास हाताशी पकडून जो घाव शिवसेनेवर, पर्यायाने महाराष्ट्रावर घातला, त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नियतीनेच जणू अंधेरी पोटनिवडणुकीचे प्रयोजन केले होते. आधी ऐटीत बेटकुळय़ा फुगवून शड्डू ठोकणाऱ्यांना कुस्तीआधीच मशालीची धग आणि चटके बसले व त्यांनी कुस्ती न खेळताच मैदान सोडले. अब्रू वाचावी म्हणून ‘झाकली मूठ…’ बंदच ठेवण्याचा भाजपायी मंडळींचा माघारीचा निर्णय हा महाराष्ट्रात एका त्वेषाने पेटलेल्या शिवसेनेच्या ज्वालाग्राही मशालीचा पहिला विजय आहे. बूड भाजण्यापेक्षा तोंड भाजलेले बरे म्हणून भाजपने दारुण पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी माघारीचा सोपा मार्ग निवडला. पण ‘सेफ पॅसेज’ शोधूनही जी बेअब्रू व्हायची ती झालीच’ असा टोला सेनेनं लगावला. (राजची साद, पण ‘क्रेडिट’ पवारांना, अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल) ‘ऋतुजा लटके यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी भाजप व मिंधे गटाची अभद्र हातमिळवणी झाली. शिवसेनेला ऊठसूट न्यायालयात जायला लावायचे. त्यात आमची शक्ती खर्ची पाडायची हे त्यांचे धोरण आहे. मिंधे गटास दूध पाजण्याचे हे प्रकार महाराष्ट्र बघत असला तरी मराठी जनता दूधखुळी नाही. या तळपत्या मशालीचा पहिला चटका आज भाजप व मिंधे सरकारला बसला, असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.