online food delivery boy save retired colonel life
मुंबई, 3 फेब्रुवारी: मुंबईच्या ट्रॅफिकचा (Mumbai traffic) अनुभव तुम्ही एकदा तरी घेतला असलेच. एकदा का ट्रॅफिकमध्ये अडकलो, की त्यातून सुटण्याचा काही नेम नसतो. पण एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी गाडी अशा ट्रॅफिकमध्ये अडकली तर काय होईल ? याची कल्पनाही करवत नाही. 25 डिसेंबर 2021 ला मात्र अशीच एक घटना घडली. आजारी असणाऱ्या एका सेवानिवृत्त कर्नलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारी गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली. पण वेळीच तेथे स्विगी (Swiggy) कंपनीचा डिलिव्हरी बॉय पोहोचला, व त्याच्या मदतीने सेवानिवृत्त कर्नलला हॉस्पिटलमध्ये वेळेत नेणं शक्य झालं आणि निवृत्त कर्नलचे प्राण थोडक्यात वाचले. आजतक ने याबाबत वृत्त दिलंय. फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट केली असून ती वाचून तुम्हीही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाहीत. स्विगी डिलिव्हरी बॉय मृणाल किरदत (Mrunal Kirdat) याने सेवानिवृत्त कर्नल मनमोहन मलिक (Rt Colonel ManMohan Malik) यांचे प्राण कसे वाचवले, याबाबतची ही पोस्ट आहे. ही व्हायरल स्टोरी स्विगीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली असून, लोक ती वाचल्यानंतर निवृत्त कर्नलचे प्राण वाचवणाऱ्या मुलाचे खूप कौतुक करत आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनमोहन मलिक यांनीही डिलिव्हरी बॉय किरदत याचे कौतुक केले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2021 ला सेवानिवृत्त कर्नल मनमोहन मलिक यांची तब्येत खूपच बिघडली होती. यानंतर त्यांचा मुलगा त्यांना कारमधून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी घेऊन जात होता. यावेळी त्यांची कार ट्रॅफिकमध्ये अडकली. पिता-पुत्रांना या ट्रॅफिकमधून बाहेर पडणं कठीण झालं. यानंतर मनमोहन यांच्या मुलाने काही दुचाकीचालकांना मदतीची विनंती केली, जेणेकरून ते लवकर रुग्णालयात पोहोचू शकतील. पण कोणीही त्यांना मदत केली नाही. तेवढ्यात तेथे स्विगी डिलिव्हरी बॉय मृणाल किरदत पोहोचला, व त्याने ताबडतोबत निवृत्त कर्नल मलिक यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मलिक यांच्या कारला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रस्ता द्यावा, अशी विनंती इतर वाहनचालकांना मृणालने केली. गाडी बाजूला न घेणाऱ्या काही वाहनचालकांसोबत त्याचा वादही झाला. पण त्याने शर्थीचे प्रयत्न करून मलिक यांची कार ट्रॅफिकमधून बाहेर काढली, व त्यामुळेच मलिक वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेतल्यानंतर आता मलिक हे ठणठणीत बरे झाले असून त्यांनी या स्विगी बॉयचे मनापासून आभार मानले आहेत. स्विगीने ही व्हायरल स्टोरी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. सोशल मीडियावर देखील हा प्रकार खूप व्हायरल होत आहे. लोकांनी सुद्धा मृणालचे खूप कौतुक केले आहे. स्विगी कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका निवृत्त कर्नलचे प्राण वाचले आहेत. या घटनेतून माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचीही प्रचिती आली आहे.