मुंबई, 16 नोव्हेंबर : एखादी कला असली की आयुष्य समृद्ध होतं. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम कलाकार करत असतात. संगीत, गायन, चित्रकला, शिल्पकला या प्रमुख कलांमध्ये अनेक उपप्रकार आहेत. या उपप्रकारातील एक विषय घेऊन त्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. त्यांची कलाकृती पाहिल्यावर त्यामागील कष्टाची जाणीव होते. एरवी डोळ्यांना अगदी सामान्य भासणाऱ्या किंवा कल्पनाही केली नसेल अशा गोष्टींचा वापर करून हे कलाकार काहीतरी असामान्य गोष्ट घडवत असतात. मुंबई तील निलेश चव्हाण हा देखील एक हटके कलाकार आहे. तो पक्ष्यांचा पंखावर चित्र कोरतो. कशी सुचली ही कल्पना? निलेश जाहिरात एजन्सी मध्ये कामाला आहे. त्यातच त्याच शिक्षण पूर्ण झालं आहे. त्यामुळे त्याला कोरीव कामाची तर सवय होती. अमेरिकेत राहणाऱ्या बहिणीने पाठवलेल्या एका पुस्तकाच्या पानावरून त्याला हे काम करण्याची संकल्पना सुचली आणि पंखावर अगदी बारीक कोरीव काम तो करू लागला. कसे गोळा केले पंख? पंख गोळा करणं हे तर खरं अवघड काम होतं. निलेश फक्त परदेशी पक्ष्यांच्या पंखावर चित्र कोरतो. त्यामुळे हे पंख मिळवण्यासाठी तो अनेक शहरामध्ये दोन वर्ष फिरला आणि त्यानंतर आता स्वतःची कला तो जोपसतो आहे. त्याची या कामामुळे आता अनेकांची ओळख झाली आहे. त्यामुळे परदेशात पक्षी विकणारे विक्रेते देखील आता त्याच्या नियमित संपर्कात आहेत. Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास! निलेश जे पंख वापरतो ते नैसर्गिक पद्धतीने गळालेले असतात. आत्तापर्यंत त्याने 100 पेक्षा जास्त चित्र रेखाटले आहेत. गेल्या 5-6 वर्षांमध्ये अनेक चित्र काढून विकले सुद्धा आहेत. आता त्याच्या या चित्रांना परदेशातून मागणी होत आहे. कोणते चित्र रेखाटतो? निलेशनं अनेक निसर्ग चित्रं तसंच देवाची चित्र पंखांवर कोरली आहे. तसंच तो ग्राहकांच्या मागणीप्रमाणे देखील चित्रं काढतो. त्याचबरोबर तो पंखांवर फॉनेटोग्राफी सुद्धा करतो.विशेष म्हणजे या प्रकारची चित्रं काढणारा निलेश हा एकमेव भारतीय कलाकार आहे. ‘या’ पानवाल्याकडं आहे 250 देशांमधील घंटांचा संग्रह, पाहा Video ‘मी कोणत्याही पक्षाला मारुन त्यांचे पंख वापरत नाही. वातावरणात बदल झाल्यामुळे गळालेल्या पंखांचा उपयोग करतो. या प्रकरणात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची नेहमीच खबरदारी घेतो. माझे काम खूप अवघड असल्याचं अनेकांना वाटतं, पण कोणतंही काम अवघड नसतं,’ असं निलेशनं आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं. अधिक माहितीसाठी संपर्क : निलेश चव्हाण आर्ट - 9819663322