मुंबई, 23 फेब्रुवारी : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. नवाब मलिक यांना आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेलं आहे. सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी ईडीचे अधिकारी करत होते. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असल्याची बातमी समोर आली आहे. (Minister Nawab Malik arrest by ED) अटक केल्यावर कुठल्याही आरोपीला 24 तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करावे लागते आणि त्यापूर्वी मेडिकल टेस्ट (वैद्यकीय तपासणी) करावी लागते. या वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करावे लागते. ईडीने मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याने आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नवाब मलिक हे सातत्याने भाजप नेत्यांवर आरोप आणि टीका सातत्याने करत होते. भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या नवाब मलिकांना अटक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा एक मोठा झटका बसला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता नवाब मलिकांना अटक झाली आहे.
नवाब मलिकांना अटक होताच मंत्री अस्लम शेख यांची प्रतिक्रिया आली आहे. अस्लम शेख यांनी म्हटलं, अशा प्रकारच्या कारवाईचं कुणीही समर्थन करणार नाही. रागाच्या भरात कारवाई करणं चुकीचं आहे. संपूर्ण महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्यासोबत आहे. वाचा : “लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी” अमोल कोल्हेंचं ट्विट सकाळी पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक स्वत:हून ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू होती. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगाराची आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केला होता. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करत इकबाल कासकरची ईडीने चौकशी केली होती. इकबाल कासकर याच्या चौकशीनंतर आता नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी अधिकाऱ्यांनी बोलावलं होतं. या जमीन व्यवहारात नवाब मलिक यांचा काही संबंध आहे का? या व्यवहारांच्या संबंधीच मलिकांना चौकशीसाठी ईडी अधिकाऱ्यांनी बोलावलं आहे का? या बाबत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाहीये. नवाब मलिकांवर कारवाई होणार याची पुसटशी कल्पना होतीच : शरद पवार शरद पवार म्हणाले, त्याच्यात काय बोलायचं त्यात काही नवीन नाहीये. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातोय त्याचं हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की, आज नाही तर उद्या हे कधीतरी घडेल. कारण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात आणि त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल अशी आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबाबत अधिक भाष्य करण्याची गरज नाही. नेमकी कशाची केस काढली त्यांनी… एक साधी गोष्ट आहे. काहीही झालं आणि त्यात मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं असंही शरद पवार म्हणाले. यात काही नवीन नाही. ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्यावरही असाच आरोप झाला होता. पण आरोप सिद्ध करू शकले नाहीत. लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं, जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि तेच या ठिकाणी घडत आहे असंही शरद पवार म्हणाले आहेत.