फाईल फोटो
मुंबई, 04 ऑक्टोबर : शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता पुन्हा एकदा निवडणुकीवरून सामना रंगणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण, या निवडणुकीसाठी अजूनही शिंदे गटाकडे चिन्ह नाही. त्यामुळे शिंदे गट आपला डमी उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गटानेही खेळी खेळली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाने आधीच याला पाठिंबा दिला आहे. पण अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव गटाला अडचणीत आणण्याची शिंदे गटाने रणनीती आखली आहे. पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला न्यायालयीन दणका देण्यासाठी शिंदे गटाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर, शिवसेना आणि शिंदे गटामध्ये थेट लढत) धनुष्यबाण चिन्ह मिळू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट न्यायालयीन लढाई लढणार आहे. न्यायालयीन लढाईत शिंदे गटाकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आणि ठाकरे गटासमोर पेच निर्माण करण्यासाठी ही चाल खेळली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लिगल टीमची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाकनं देखील उमेदवार द्यावा. उमेदवार दिला तरंच न्यायालयात बाजू मांडण्यासाठी त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. असा या चर्चेत होरा होता. म्हणूनच शिंदे गट सुद्धा अंधेरीच्या पोटनिवडणुकीत एक डमी उमेदवार देण्याची शक्यता आहे. (शिवसेनेची पुन्हा अग्निपरिक्षा? धनुष्यबाण जाणार की राहणार? निवडणूक आयोग घेणार निर्णय?) एका चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला असला तरी न्यायालयीन लढाईत जिंकण्यासाठी शिंदे गट देखील आपला उमेदवार पुढे करू शकतो. त्यामुळे शिंदे गटाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार आहे, हे पाहण्याचे ठरणार आहे.