डोंबिवली, (अमित राय) 04 ऑक्टोंबर : डोंबिवली येथील भोपर परिसरात मागच्या दोन दिवसांपूर्वी पहाटे पाचच्या सुमारास एका घरात अचानक लागलेल्या आगीमुळे चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. यात आईसह दोन मुलींची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान ही आग अचानक लागली नसल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. वडिलांनी कथितरित्या जिवंत जाळलेल्या दोन मुलींचा काल (दि.03) डोंबिवली परिसरातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान यामध्ये समीरा पाटील (14) आणि समीक्षा (11) या बहिणी आगीत 91 टक्के भाजल्या होत्या. दरम्यान त्या मुलींसह आईलाही जास्त भाजल्याने प्रीती पाटील (35) यांचे निधन झाले. या घटनेत आरोपी प्रसाद पाटील (40) हा देखील जखमी झाला आहे. डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांनी कलम 302 आणि इतर संबंधित कलमांद्वारे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपी पाटील हे फक्त दहा टक्के भाजले आहेत.
हे ही वाचा : केचअपच्या बाटलीने चिरला गळा, अमित शाहांच्या दौऱ्यावेळीच जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (01) पहाटे 5.30 च्या सुमारास घडली, परंतु अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना सकाळी 8.30 च्या सुमारास याबाबत माहिती देण्यात आल्याने मदत उशिरा पोहोचल्याचे म्हणणे आहे. दरम्यान बापाचे बाहेर एका महिलेशी संबंध असल्याचे घरच्यांना माहिती मिळाली होती. यामुळे घरात नेहमी यावरून भांडण होत असे. या वादातून कंटाळून आरोपी प्रसादने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
मुंबईतील एका शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीत नववीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला. क्लास सुरू असताना गोंधळ केल्याच्या संशयावरुन संस्कृतच्या शिक्षकाने या विद्यार्थ्याला कानशिलात लगावली असता ही घटना घडली.
हे ही वाचा : बुलेट अन् फोटोग्राफीची हौस, 6 वी पास तरुणाशी लग्न; शेवटी PNB मॅनेजरने सर्वांनाच हादरवलं!
सांताक्रूझ पोलिसांनी शिक्षक कमलेश तिवारी (50) यांच्यावर आयपीसी कलम 325 (गंभीर दुखापत) आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यातील कलम 75 अन्वये एका मुलासोबत क्रूर कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. 30 सप्टेंबर रोजी याबाबत एफआयआर दाखल झालं असून त्यांना अद्याप या प्रकरणात अटक झालेली नाही.