मुंबई, 12 ऑक्टोंबर : शिवसेना प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नव्या नावासह मशाल चिन्हावर अंधेरी पूर्वमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेच्या चिन्हात बदल झाला असला तरी, त्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम शिवसेनेवर होणार नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेची या मतदारसंघातील बांधणी आणि त्यातही दिवंगत आमदार रमेश लटके यांचे काम ही उद्धव ठाकरे यांची जमेची बाजू असल्याने ते सोपे जाणार आहे. दरम्यान रमेश लटके यांच्या पत्नी शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याच्या अनेक गोष्टींमुळे राजकारण चांगलच तापलं होत. यावर खुद्द ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
ऋतुजा लटके माध्यमांशी बोलताना म्हणाल्या कि, माझ्यावर कोणताही दबाव नाही, मी मशाल चिन्हावर निवडणूक लढणार आहे. मी ही पोटनिवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मशाल या चिन्हावर लढवणार आहे. माझे पती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासोबत होते. त्यांची बाळासाहेबांप्रती निष्ठा होती. त्यामुळे मी शिंदे गटासोबत जाणार नाही माझ्यावर तसा कोणताही दबाव नाही. माझ्याकडे पाहिल्यावर तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे होते माझ्यावर दबाव आहे का? आमची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले नसल्याचेही त्या म्हणाल्या.
हे ही वाचा : मुंबई क्राईम ब्रँच कोल्हापुरात, ठाकरे गटाने बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप
2014 व 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून शिवसेनेचे रमेश लटके येथून निवडून गेले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके यांना 62 हजार 773 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे अमीन कुट्टी यांना 27 हजार 951 मते मिळाली होती. शिवसेना व काँग्रेसच्या मतांची बेरीज 90 हजारपेक्षा जास्त होते. याच विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मते मिळाली होती. याचाच अर्थ शिवसेना व काँग्रेसचे मताधिक्य भाजपपेक्षा दुपटीने जास्त आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट
पोटनिवडणुकीतील प्रस्तावित उमेदवार ऋतुजा लटके या महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा अद्याप BMC प्रशासनानं स्वीकारलेला नाही. जर राजीनामा स्वीकारला नाही तर त्या अंधेरी पोटनिवडणुकीत अर्ज भरू शकणार नाहीत.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंची डोकेदुखी पुन्हा वाढली, धनुष्यबाण गेलं आता मशाल चिन्हावर ‘या’ पक्षाचा दावा
त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा म्हणून अनिल परब आणि माजी नगरसेवकांनी इकबालसिंह चहल यांची भेट घेतली. 14 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी आता फक्त तीन दिवस बाकी आहेत. अशात राजीनामा स्वीकारला गेला नाही तर त्यांना उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे असं झाल्याय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवार बदल करावा लागू शकतो.