मुंबई, 06 ऑक्टोंबर : सुमारे दशकभरापूर्वी मुंबईतील वरळी येथे झालेल्या अपघातात एका मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांनी त्याचा सत्कार केला होता. यानंतर 2016 मध्येही त्याने धाडसी कृत्य करत वरळी सी-लिंकवरून उडी घेत आत्महत्या करणाऱ्या एका माणसाला वाचवले होते. असाच एक फोन वाजला तो फोन त्याचा शेवटचा कॉल होता. चार प्रवासी असलेली एक कार टायर फुटल्यानंतर सी लिंकवर रेलिंगला धडकली आहे तातडीने मदतीची गरज असल्याचा तो फोन होता.
36 वर्षीय मुंबईतील सुरक्षा विभागात काम करणाऱ्या चेतन कदम यांचा तो शेवटचा कॉल होता. सी लिंकवर कारला वाचवण्यासाठी गेलेल्या चेतन यांना काही मिनिटांनंतर आपल्याला जग सोडायचे आहे याची कल्पना देखील नव्हती परंतु नियतीला हे मान्य होत. बचावकार्य करण्यासाठी गेलेल्या चेतन यांच्यासह 5 जणांना दुसऱ्या एका वेगवान कारने घटनास्थळी असलेल्या बचावकर्त्यांना धडक दिली. आणि मारल्या गेलेल्या पाच जणांमध्ये चेतन यांचा समावेश होता.
हे ही वाचा : मुंबईत सी लिंकवर भीषण अपघात, भरधाव कार रुग्णवाहिकेसह गाड्यांवर आदळली, 5 ठार
चेतन यांचा जिवलग मित्र प्रमोद सावंत म्हणाले कि, कदम 2009 पासून रात्रीच्या ड्युटीवर होते आणि बहुतेक अपघात कॉल अटेंड करत होते. आज तो स्वत: बळी ठरला, याचे आम्हाला अत्यंत वाईट वाटत आहे. त्याने केलेल्या बचावकार्याचे काम मोठे असल्याने त्याचा आम्हाला अभिमान होता.
कदम यांचे माजी वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश केदार म्हणाले कि, समुद्रावरून उडी मारून आत्महत्या करू इच्छिणाऱ्या लोकांचे लक्ष विचलित करण्यात तो पारंगत होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा वरळी येथील एका तरुणीचे प्राण वाचवले होते आणि तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर चेतन यांनी अनेकांचे प्राण वाचवले. अपघातग्रस्तांना वाहनांमधून काढण्यात आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यातही ते अत्यंत चपळाईने काम करत असल्याचे ते म्हणाले.
रुग्णवाहिका चालक सोमनाथ साळवे (29) आणि गजराज सिंग (42), सत्येंद्र सिंग (35) आणि राजेंद्र सिंगल (40) या कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. हे तिन्ही कर्मचारी मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. कदम यांचे सहकारी हेमंत तोरस्कर यांच्यासह दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण पहिल्या अपघातात जखमी झालेल्यांना मदत करत असताना, सुमारे 15 मिनिटांनंतर, इरफान अब्दुल रहीम बिल्कीया नावाच्या दक्षिण मुंबईतील रहिवाशाने वेगवान ह्युंडाई क्रेटाने बचावकार्य करणाऱ्यांना जोरदार धडक दिली. रिअल इस्टेट डेव्हलपर असलेल्या बिल्कीयाला बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना पुन्हा धमकीचे फोन, जीवे ठार मारण्याची धमकी
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या महितीनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिला अपघात हा मारुती स्विफ्ट कारचा झाला होता. दरम्यान या कारमधील चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची नावे सिद्धार्थ जोएल, रेहान पटेल, आलिया भतेन आणि शहाणे फॉर्च्युनल अशी आहेत.
दरम्यान यामध्ये निष्पाप कित्येक लोकांचा जीव वाचवलेल्या चेतन कदम यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळचे सिंधुदुर्गातील कुडाळचे रहिवासी असलेले कदम यांच्या पश्चात पत्नी, त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आणि आई असा परिवार आहे. ते राष्ट्रवादीच्या युवा शाखेचे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा देणारी ना-नफा युग प्रवर्तक प्रतिष्ठानची स्थापना केली होती.