Republic Day
सांगली, 26 जानेवारी: आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात आहे. दरम्यान, एका वानराचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक वानर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे साक्षीदार ठरले. वानर ध्वजाचा स्तंभ धरून राष्ट्रगीत संपेपर्यंत उभे राहिले असल्याचे सांगण्यात येत आहे. माकड (Monkey) एक असा प्राणी आहे, जे सतत इकडून - तिकडे उड्या मारत राहतं. अनेकदा माकडाच्या अजब करामतीचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत असतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो सांगली जिल्ह्यातील आहे. सांगली जिल्ह्यातील आज पलूस तालुक्यातील नागराळे येथे ग्रामपंचायत इथे सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी ध्वजारोहण झाले. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले आणि समोर एक वेगळेच चित्र दिसले. ग्रामपंचायतीच्या छतावर ध्वजाचा स्तंभ धरून एक वानर बसले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ते वानर राष्ट्रगीत संपेपर्यंत ते तसेच बसून राहिले आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर निघून गेले. हे विलक्षण क्षण सर्वांनी पाहिले. अनेकांनी हा क्षण मोबाईल मध्ये कैद केला. काही दिवसांपूर्वी, वानराचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन माकडं एका शाळेच्या छतावर उभा आहेत आणि दोघंही ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते दोरी ओढतात तेव्हा ध्वज व्यवस्थित उघडला जात नाही.. यानंतर माकड स्वतःच वरती चढतं आणि हा संपूर्ण ध्वज खोलतं. यानंतर ध्वजामधील फुलं खाली पडू लागतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरला होता.