JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नवीन युग सुरू होतंय की राजघराण्याचा सूर्य मावळतोय? राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

नवीन युग सुरू होतंय की राजघराण्याचा सूर्य मावळतोय? राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 सप्टेंबर : ब्रिटनवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी (8 सप्टेंबर 2022) निधन झालं. वयाच्या 96 व्या वर्षी एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर जगभरातून मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनीसुद्धा ट्विट करत एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. काय म्हणाले राज ठाकरे - “ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. 70 वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी या पदावर होत्या. आणि ही 70 वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70 वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत बस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्यामुळे. ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विस्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वत:चा इगे बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय यांनी दाखवलं. आणि इतक्या भानगडी आणि शब्दश: ब्रिटिश राजघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइडसनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं. कुठलाही राजमुकूट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्या शिरावरुन हा मुकूट उतरला. एलिझाबेथ 2 ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरू होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाचं असेल. एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मृतीस अभिवादन”. या शब्दात राज ठाकरे यांनी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  राणी एलिझाबेथनंतर ‘कोहिनूर’च्या वारसदाराचं रहस्य वाढलं, वाचा कुणाला मिळणार मुकुट! दरम्यान, प्रिन्स फिलिप यांचं त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या केवळ काही आठवडे आधी निधन झालं होतं. त्यानंतर वयाच्या 96 व्या वर्षी महाराणी एलिजाबेथ यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडवर शोककळा पसरली आहे. सारे नागरिक दु:खात आहेत. सर्वाधिक काळ इंग्लंडच्या महाराणी पदावर राहिल्याचा मान त्यांना मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या