मुंबई, 1 ऑक्टोबर : मिलिंद नार्वेकर येत्या काळात शिवसेनेत येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तसंच एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं तर ठाकरेंकडे 15 पैकी 5 आमदारही शिल्लक राहणार नाहीत, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे या चर्चा सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘मी भाग्यवान आहे, कारण मला ब्रम्होत्सवमच्या पाचव्या दिवशी शुभ अशा गरुडा वाहनमचा साक्षीदार होता आलं. माझ्यासोबत सरन्यायाधीश उदय लळीत, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि तिरुमाला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डीही उपस्थित होते’, असं ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.
शिंदे नार्वेकरांच्या घरी एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवामध्ये मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हापासून नार्वेकरांच्याबाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. शिवसेनेमध्ये याआधी झालेल्या बंडावेळी अनेकांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करत शिवसेनेची साथ सोडली होती. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. कोण आहेत मिलिंद नार्वेकर? 54 वर्षांचे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचं राजकीय सल्लागार मानले जातात. राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडताना नार्वेकर यांना जबाबदार धरलं होतं. 2018 साली मिलिंद नार्वेकर यांना शिवसेना सचिव म्हणून घोषित करण्यात आलं होतं. याआधी नवरात्राच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असलेले चंपासिंग थापा आणि बाळासाहेबांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक मोरेश्वर राजे यांनीही एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. दसरा मेळाव्यात कुणाचे प्रवेश? अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छूक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील, असा गौप्यस्फोट काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. 5 ऑक्टोबरला वांद्र्याच्या बीकेसी मैदानात एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होणार आहे. तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल.