JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमित शाहांनी मुंबईत ते पोस्टर पाहिलं, अन् सत्तांतर घडलं! शिवसेनेतल्या भुकंपाची Inside Story

अमित शाहांनी मुंबईत ते पोस्टर पाहिलं, अन् सत्तांतर घडलं! शिवसेनेतल्या भुकंपाची Inside Story

राज्यात मविआ सरकार अस्तित्वात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी एक पोस्टर पाहिलं. यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय भुकंपाच्या आखणीला सुरूवात झाली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जानेवारी : राज्यात मविआ सरकार अस्तित्वात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी एक पोस्टर पाहिलं. पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार होते. अमित शाह यांनी ते पोस्टर पाहिलं आणि म्हणाले ‘अपने को इसके बारे मे सोचना है..’ काय होता हा भन्नाट किस्सा आपण जाणून घेऊया. जून 2022 मध्ये महाराष्ट्रात एक मोठं सत्ता नाट्य घडलं. जे घडलं ते अनपेक्षित होतं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. आपल्यासाठी हे सगळं अचानक घडलं असं असलं तरी सरकार स्थापन करण्याआधी मोठी व्यूहरचना होती. त्या व्यूहरचनेत दिल्लीची भूमिका महत्वाची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या अनेक दिग्गज धुरीणांना चकवा देणारी ही राजकीय घडामोड होती. भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलेल्या शिवसेनेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला धक्का दिला होता. त्यांच्यासाठी शिवसेनेने ऐनवेळी घेतलेली भूमिका बुचकळ्यात टाकणारी होती. अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास सरकार बनलं. त्यानंतर अगदी पहिल्याच आठवड्यात स्वामी नारायण पंथांचा एक कार्यक्रम नवी मुंबईत होता. त्यासाठी प्रमुख अतिथी होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. त्यावेळी त्यांना घेण्यासाठी आशिष शेलार मुंबई विमानतळावर गेले. ‘तिथून ते कार्यक्रम स्थळाच्या दिशेनं निघाले. गाडी थोडी पुढे आल्यावर रस्त्याच्या बाजूला लावलेलं एक भलं मोठं होर्डिंग अमित शहांच्या नजरेला पडलं. त्या होर्डिंगवर सोनिया गांधी, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे भले मोठे फोटो लागले होते. ते होर्डिंग पाहून अमित शाह म्हणाले ‘ये कैसा लगता है.., अचंबा है अपने से बडा स्टेट छीन लिया’ ‘तिथून ते आणखी थोडं पुढे गेले. टोलनाक्यावर गाडी स्लो झाली. तिथंही मोठं होर्डिंग होतं. त्यावर देखील बाळासाहेबांबरोबर शरद पवार आणि सोनियाजींचा फोटो होता. परत अमित शाह म्हणाले, ‘अपने को इसके बारे मे सोचना है..’ त्यावर आशिष शेलार म्हणाले ‘अमितभाई कुछ करना पडेगा’. त्यावेळी अमित शाहांनी थेट उत्तर दिलं. ‘भावनामे जो दी जाती है वह प्रतिक्रिया होती है, ठंडे दिमाग से किया जाता है वह पूर्ण काम होता है. अपने को रुकना है..’

आशिष शेलार यांना त्या दोन वाक्यातून कळलं होतं. राग, भावना हा राजकारणाचा भाग नाही. राजकारण राजकारणाच्या पातळीवर करायचं ही केंद्रीय नेतृत्वाची भूमिका होती. अमित शाह यांनी पोस्टर पाहिल्याच्या अडीच वर्षानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. शिवसेनेत झालेल्या बंडाचा राजकीय फायदा घेत भाजपनं राज्यात पुन्हा आपली सत्ता प्रस्थापीत केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कधी स्वप्नातही वाटलं नाही अशा गोष्टी घडल्या. राज्यातली महाविकास आघाडीची सत्ता गेली. राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार आलं. यातून अमित शाह यांच्या राजकारणाची कल्पना त्यांच्या राजकीय विरोधकांना आली असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या