मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आज देशमुख यांच्या याचिकेवर निकाल लागणार आहे.
मुंबई, 26 ऑगस्ट : शंभर कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये आहेत. या दरम्यान त्यांची आज जेलमध्ये प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येवून पडले आहेत. त्यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहत आहेत. पण चक्कर येवून पडल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. देशमुख यांना याआधी देखील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना खांद्याचं दुखणं वाढलं होतं. तसेच त्यांना वेगवेगळ्या व्याधी देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी जे जे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आजच्या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण जेलमधून याबाबतची माहिती समोर आली आहे. ( शिवसेना सावरण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंनी केली या पक्षासोबत युती ) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी मुंबईतील मोठमोठे डान्सबार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल केले, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यांनी याबाबतचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवलं होतं. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संबंधित प्रकरणामुळे विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सगळ्या घडामोडींदरम्यान सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी छापा टाकला होता. या छाप्यामध्ये मिळालेल्या माहितीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या घडामोडींनंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. देशमुखांवर कोर्टात आरोपपत्रदेखील दाखल करण्यात आलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान जेलमध्ये असलेले देशमुख यांना प्रकृती संबंधित बऱ्याच तक्रारींना सामोरं जावं लागत आहे.