अहमदनगर, 27 नोव्हेंबर : नेहमीप्रमाणे टीव्ही बघत रात्रीचं जेवण करत असताना एका कुटुंबाला एकदम धाडकन आवाज आला आणि त्यांच्या घरात एक भुकेलेला एक अगंतुक पाहुणा अवतरला. पण या पाहुण्याकडे पाहताच घरातल्या सगळ्यांचाच थरकाप उडाला. घरातले सगळे त्याला पाहताच घराबाहेर पळाले आणि बाहेरून कडी लावून घेतली. रात्रीचं जेवण सुरू असताना अचानक बिबट्या घरात शिरतो तेव्हा काय अवस्था होत असेल त्याचं हे वर्णन. नगर जिल्ह्यातल्या पारनेरजवळच्या एका गावात ही घडना घडली. तब्बल 3 तास हा बिबट्या त्या घरात ठाण मांडून होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी बचाव पथक पाठवलं आणि गुंगीचं इंजेक्शन देऊन (Dart मारून )बिबट्याला पकडण्यात यश आलं. पुणे आणि अहमदनगरच्या मध्ये असणाऱ्या पिंपळगाव रोठा गावातली ही घटना आहे. पाळीव कुत्र्याचा घास घेण्यासाठी बिबट्या त्याच्या मागोमाग घरात शिरला आणि एकच हल्लकल्लोळ माजला. घरातले सगळे बिबट्याला खोलीत कोंडून बाहेर पडले. तेव्हा घरात टीव्ही सुरू होता. खोलीत अडकलेला बिबट्या पाहण्यासाठी शे - पाचशे गावकरी जमले. त्यामुळे बिबट्या आणखी बिथरला. वनविभागाने पाठवलेल्या माणसांनी 3 तासांच्या प्रयत्नांनी बिबट्याची सुटका केली. त्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि मग पकडण्यात आलं. बिबट्या वनविभागाच्या निगराणीत होता. पशुवैद्यकांनी त्याला तपासल्यानंतर त्याची पुन्हा जंगलात रवानगी करण्यात आली. बिबट्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या वनविभातले वरीष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख दिलेल्या माहितीनुसार, हा एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या होत्या. आसपासच्या जंगलात त्याचं वास्तव्य असावं. भक्ष्याच्या शोधात तो गावाच्या दिशेने आला आणि कुत्र्याच्या मागोमाग घरात शिरला. चार वर्षांचा हा बिबट्या असल्याचं लक्षात आलं.