कोल्हापूर, 28 मे : छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज आणि राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आता आपल्या वडिलांच्या टीकेवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. संभाराजे यांचे वडील शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले पुत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेलं विधान योग्य नसल्याचं म्हटलं. तसेच संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णयही अयोग्य होता, असंदेखील ते म्हणाले. शाहू महाराजांच्या या टीकेवर आता संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आपले वडील जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे. संभाजीराजे नेमकं काय म्हणाले? “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.
शाहू महाराज नेमकं काय म्हणाले? छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) आपले पुत्र युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचे उघडपणे कान टोचले आहेत. संभाजीराजेंनी स्वराज्य (Swarajya) नावाच्या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचं रुपांतर भविष्यात पक्षातही होऊ शकतो, असा संकेतही त्यांनी दिला आहे. याशिवाय संभाजीराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) टीका केली होती. संभाजीराजेंच्या या सर्व कृतीवर त्यांचे वडील शाहू महाराजांनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं, किंवा स्वतंत्र पक्ष काढणं योग्य नसल्याचं शाहू महाराज म्हणाले आहेत. “मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला. त्यांनी शब्द पाळला नाही”, असे आरोप संभाजीराजेंनी केले होते. ते आरोप बरोबर नाहीत, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली आहे. शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात जो ड्राफ्ट तयार झाला होता तो कच्चा ड्राफ्ट होता, असा दावा शाहू महाराजांनी केला. “हा छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे. तर मुळात संभाजीराजेंनी पक्ष घोषित करणं हे सुद्धा चुकीचं होतं”, असं म्हणत शाहू महाराजांनी संभाजीराजे छत्रपती यांचे कान टोचले आहेत. ( मनसेचा पार पडला मेळावा, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले नवे आदेश ) संभाजीराजे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभा निवडणूक लढणार नसल्याचं घोषित केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शब्द फिरवल्याचा आरोप केला. पण त्यांच्या भूमिकेवर त्यांचे वडील शाहू महाराज यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अनेक गोष्टींचा हेतू उलगडा केलेला आहे. यातून त्यांनी थेट संभाजीराजेंना सुनावलं आहे. राज्यसभेच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेकडून अट ठेवण्यात आल्याच्या दाव्यावर त्यांनी भाष्य केलं. तसेच संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची जी घोषणा केली त्याबाबत कुटुंबियांशी कोणतीची चर्चा केली नसल्याची माहिती शाहू महाराजांनी दिली. तसेच शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आपण त्यांना प्रत्यक्ष फोन करुन अभिनंदन केलं, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली. शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढण्याच्या निर्णयावरुन मोठा दावा केला आहे. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं, ही भाजपची खेळी होती. बहुजन समाजामध्ये फूट पाडण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा मोठा दावा शाहू महाराजांनी केला आहे. तसेच राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, अशी माहिती शाहू महाराजांनी दिली. फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांच्यासमोर स्वबळावर लढण्याचा किंवा इतर पक्षांचा पाठिंबा घेण्याचा असे दोनच पर्याय होते. याआधी भाजपने त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा आम्ही त्यांना तो प्रस्ताव नाकरण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी ऐकलं नाही. ते राज्यसभेवर गेले. त्यानंतर त्यांनी जे जे राजकीय निर्णय घेतले त्याबाबत आपल्याशी चर्चा केली नाही, अशी माहिती शाहू महाराजांनी दिली.