JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur : गेली कित्येक वर्षे 'ही' मंडळी करतायत नदी स्वच्छतेचं कार्य, Video

Kolhapur : गेली कित्येक वर्षे 'ही' मंडळी करतायत नदी स्वच्छतेचं कार्य, Video

हा ग्रुप इथं फक्त पोहण्यासाठी येत नाही. तर, गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्याकडून अविरतपणे नदी घाटाची साफसफाई होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 4 जानेवारी :  कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीवर सकाळ सकाळी बरेच जण पोहायला गर्दी करतात. वेगवेगळ्या ग्रुपचा यामध्ये समावेश आहे. ‘पंचगंगा नदी विहार मंडळ’ हा त्यापैकीच एक ग्रुप आहे. या ग्रुपची खासियत म्हणजे तो फक्त नदीवर  पोहण्यासाठी येत नाही. तर गेल्या कित्येक वर्षांपासून ते अविरतपणे नदी घाटाची साफसफाई देखील करतात. कोल्हापुरात पट्टीचे पोहणारे अनेक जण न चुकता रोज पंचगंगा नदी घाटावर हजेरी लावत असतात. स्विमिंग टॅंकचा पर्याय सोडून ही सगळी मंडळी पंचगंगा नदीवर पोहणे पसंत करतात. वर्षभर न चुकता या ठिकाणी येणाऱ्या या सर्वांचा हा नित्यक्रम आहे. रोज सकाळी पावणे सहा ते नऊ वाजेपर्यंत इथं सर्वजण पोहण्यासाठी येतात. नदी विहार मंडळात जवळपास 100 जण आहेत. यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत वेगवेगळ्या गटातील मंडळींचा समावेश आहे. त्याचबरोबर काही मुली आणि तरुणी देखील या ग्रुपमध्ये आहेत. नदीवर पोहण्याशिवाय घाट स्वच्छतेचे काम देखील विहार मंडळाकडून गेली कित्येक वर्षे सातत्याने सुरू आहे. पोहायला आल्यावर दररोज नदीच्या पात्रात पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, निर्माल्य या प्रकारच्या अनावश्यक गोष्टी बाहेर काढून सगळी स्वच्छता करायची. ही स्वच्छता पूर्ण झाल्यानंतरच पाण्यात उडी मारायची हा त्यांचा नित्यक्रम गेली 25-30 वर्ष सुरू आहे. हमाल बनला स्वच्छतादूत, 25 वर्षांपासून करतोय कृष्णेची सेवा! Video पंचगंगेला प्रदुषणाचा विळखा पंचगंगा नदीवर नागरिकांना धुणं धुण्यास मनाई आहे.  त्यानंतरही नदीत किंवा घाटात नागरिकांकडून मोठ्या प्रमाण कचरा टाकला जातो. त्याचबरोबर जवळपास 180 गावांचे मैलामिश्रित पाणी पंचगंगा नदीत विसर्जित होते.  या नदीला प्रदुषणाचा विळखा पडलाय. या कारणामुळे काही जणांनी इथं पोहायला येणं बंद केलं आहे, अशी माहिती नदी विहार मंडळाच्या एका सदस्यानं दिली.

महापालिकेला मागणी कोल्हापूर शहरातल्या धाळी नाल्यातून मैलायुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यामुळे पंचगंगेचं पाणी दूषित बनले आहे. कोल्हापूर महापालिकेने यावर कारवाई करावी, नदीत मिसळणारे सांडपाणी रोखावे, नदीघाटावर होणाऱ्या पार्ट्या बंद कराव्यात, त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना योग्य सोयी-सुविधा द्याव्यात, अशी पंचगंगा विहार मंडळाची मागणी आहे. या सदस्यांनी याबाबतचं निवेदनही पालिकेला दिल्याची माहिती उदय गायकवाड यांनी दिली. नदीमध्ये पोहायला शिकणे हे लहान मुलांचा उन्हाळी सुट्टीतला विरंगुळा असतो. त्यामुळे सुट्टीत नदीवर पोहायला येणार्‍यांची संख्या चांगलीच वाढते. लहान मुलांना पोहायला शिकवण्याचं काम देखील या पंचगंगा विहार मंडळाच्या सदस्यांकडून केलं जातं, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या