कोल्हापूर, 05 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. (Kolhapur Suicide Case) मागच्या 48 तासांता कोल्हापूरमध्ये दोघांनी आत्महत्या केली आहे. दरम्यान मागच्या महिन्यात एका वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या तरूणीने आत्महत्या केली होती. तर शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील तरूणाने मागच्या 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना काल शुक्रवारी राजेंद्रनगर येथील कॉलेज तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
साक्षी सचिन शिवशरण (वय 17) असे तिचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बारावी उत्तीर्ण झालेल्या साक्षीने पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. सकाळी दहा वाजता साक्षी आई, बहीण व लहान भावांशी गप्पा मारून दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली. लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबीय, नातेवाईकांनी आक्रोश केला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : 2013 साली अंधेरीतून झालेलं दुसरी शिकणाऱ्या मुलीचं अपहरण; 9 वर्षांनी पोलिसांना या अवस्थेत सापडली
दत्तवाडमधील तरुणाच्या आत्महत्येचेही गुढ कायम
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या दत्तवाड गावातील एका तरूणाने आत्महत्या केली आहे. आपल्या दत्तवाड (ता. शिरोळ) येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ सुभाष जाधव (वय 19 ) या महाविद्यालयीन तरुणाने बुधवारी रात्री दोनच्या सुमारास व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवला आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेने दत्तवाड गावात अचानक खळबळ माजली होती. दरम्यान त्याने का आत्महत्या केली हे कारण समोर येऊ शकले नाही.
सिद्धार्थने मलिकवाड रोड दत्तवाड येथील आपल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला बुधवारी मध्यरात्री गळफास लावून घेतला. सिद्धार्थ बारावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत आहे. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुरुंदवाड पोलिस तपास करीत आहेत. कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे समजले नसल्याने गावात चर्चेला उधाण आले होते.
हे ही वाचा : OMG! रुग्णाच्या पोटातून निघाला मोठा स्टिलचा ग्लास; पण शरीरात गेला तरी कसा पाहा
प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलीची आत्महत्या
कोल्हापूरातील उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. लोकांचा जीव वाचवणाऱ्या एका डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. अपूर्वा हेंद्रे असे तिचं नाव असून ती प्रसिद्ध डॉक्टर प्रवीणचंद्र हेंद्रे याची कन्या आहे. आज सकाळी ताराबाई पार्क येथील डी मार्टच्या समोर ती बेशुध्द अवस्थेत सापडली होती. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचे निधन झाले.