कोल्हापूर, 7 जुलै (ज्ञानेश्वर साळोखे) : कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. तर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 6 इंचावर पोहचली आहे. 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असून त्यामुळे 60 पेक्षा जास्त गावांचा थेट संपर्क तुटला आहे. या भागात पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे. स्थलांतराची तयारी कोल्हापूर जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून NDRF ची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. या पथकाकडून पूरग्रस्त ठिकाणाची पाहणी करण्यात आलीय. पहिल्या टप्प्यात जनावरांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एक लाख 94 हजार पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतराची प्रशासनाची तयारी केली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.धबधब्याच्या ठिकाणी किंवा पूर पाहण्यासाठी नदीच्या काठी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला, पुढील काही तास महत्त्वाचे जिल्ह्यात 8 जुलै 2022 पर्यंत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवावा जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 0231- 2659232, 2652950, 2652953, 2652954, टोल फ्री क्रमांक 1007 या क्रमांकावर संपर्क करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.