कोल्हापूर, o8 डिसेंबर : चहा बरोबर भडंग खायला नक्कीच आवडत. प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी जास्त काळ टिकणारा पदार्थ म्हणजे भडंग. झटपट आणि झणझणीत कोल्हापुरी भडंग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इथल्या भडंगची चव बऱ्याच जणांना नेहमी येथे खेचून आणत असते. याच भडंगसाठी कोल्हापुरात जनता भुवन हॉटेल प्रसिद्ध आहे. येथे मिळणाऱ्या ताज्या भडंगमुळे या हॉटेलची एक वेगळी ओळख आहे. कधी सुरू झालं हॉटेल? कोल्हापूरचे भूषण शिंदे यांनी पंतप्रधान रोजगार योजनेतून जनता भुवन हे हॉटेल 1976 साली सुरू केलं होतं. त्यांनी या हॉटेलमध्ये व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने स्पेशल भडंग बनवायला सुरू केली होती. पण या भडंगला खरंतर 1995 नंतर प्रसिद्धी मिळू लागली. या हॉटेलमध्ये नेहमी रेडिओवर जुनी गाणी चालू असायची. त्यामुळे जुन्या गाण्यांच्या बरोबर चहा-भडंगचा आस्वाद घ्यायला मोठमोठे अधिकारी देखील हजेरी लावत असत. अशी गाणी आजही येथे ऐकायला मिळतात. पुढे भूषण शिंदे यांच्या सोमनाथ आणि अमित या मुलांनी या भडंगला व्यवसायिक स्वरूप दिले. त्यांनी त्यांची सुरुवाती पासूनची भडंगची चव आजतागायत राखली आहे. त्यामुळे या हॉटेलला आज देखील वेटींग बघायला मिळते. Kheema Paratha : केरळी हॉटेलमध्ये मिळते फेमस कोल्हापूरी डिश, पाहा Recipe Video हॉटेल जनता भुवनमध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला काऊंटरवर भडंगने भरलेली परात ठेवलेली दिसते. तिथेच ती भडंग खायची इच्छा अजून तीव्र होऊ लागते. प्लेट मध्ये भडंग वरून शेव, कांदा आणि एक मिरची अशा मस्त सजवलेल्या प्लेटमध्ये आपल्याला ती खायला दिली जाते. हॉटेल मध्ये ताजी भडंग बनवण्याची परंपरा आहे, त्यामुळे थोड्या थोड्या कालावधीनंतर ती काऊंटर वरची परात पुन्हा पुन्हा भरली जाते. कसा बनवला जातो भडंग? भल्या मोठ्या कढईमध्ये ही भडंग एका वेळी बनवली जाते. तेल गरम झाल्यावर त्यात मिक्सर मध्ये बारीक केलेला लसूण टाकून तो व्यवस्थित तळला जातो. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून तो देखील तळून घेतला जातो. या दोन्ही मध्ये पाण्याचा जरा देखील अंश शिल्लक राहू नये यासाठी या दोन्ही गोष्टी भरपूर वेळ तळल्या जातात. त्यांनतर त्यात हळद, आधीच तळून घेतलेले शेंगदाणे, मीठ टाकण्यात येते. त्यानंतर हॉटेलचा स्पेशल भडंग मसाला टाकला जातो. त्यानंतर त्यात चटणी आणि चिरमुरे टाकले जातात. मग हे सर्व मिश्रण एकत्र मिसळले जाते. सगळं एकजीव झाल्यावर शेवटी भडंगमध्ये पीठीसाखर देखील मिसळली जाते. दिवसातून किती वेळा बनते भडंग ? हॉटेल जनता भुवन ही हॉटेल सकाळी पाच वाजल्या पासून सुरू होते. पण येथे तयार होणारी भडंग ही दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंत मिळते. या दुपार पासुनच्या कालावधीत बऱ्याच वेळा ही भडंग बनवली जाते. कढई मध्ये एकावेळी 700 ग्रॅम भडंग बनवली जाते असे आचारी सांगतात. तर दिवसभरात अंदाजे 25 परात भडंग बनवली जाते, असे हॉटेलचे मालक सोमनाथ यांनी सांगितले.
Kolhapur : मातीच्या भांड्यामधे बनवलेली कोल्हापूरच्या रांगड्या चवीची मिसळ, Video
सातासमुद्रापार देखील जात होती भडंग जनता भुवनची भडंग ही कोरोना काळाच्या आधी बाहेरच्या आखाती देशांमध्ये जात होती. महालक्ष्मी भडंग या नावे शिंदे बंधूंनी असे या भडंगचे ब्रॅण्डिंग सुरू केले होते. पण कोरोनामुळे या भडंगला देखील फटका बसल्याचे सोमनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण, उत्तर कर्नाटक, मुंबई, पुणे अशा 80 ते 100 किलोमीटरच्या परिघात ही भडंग 300 किलो प्रमाणे वितरीत केली जाते. अजूनही ऑफलाईन ट्रांसॅक्शन हॉटेल जनता भुवनमध्ये जुन्या गोष्टी आहेत तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच पैश्यांच्या देवाणघेवाणीत देखील, ऑनलाईन पद्धत न अवलंबता येथे फक्त ऑफलाईन पद्धतीनेच पैसे स्वीकारले जातात.
हॉटेल जनता भवन वेळ - सकाळी 5 पासून ते रात्री 8 पर्यंत (भडंग - दुपारी 3 नंतर) पत्ता - कोंडा ओळ चौक, सुभाष रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर संपर्क - सोमनाथ शिंदे - 9673749191