कोल्हापूर, 22 ऑक्टोबर : कोल्हापूरची उदारता, सामाजिक भावनेची जाणीव या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत. समाजहितासाठी कोल्हापूरचा प्रत्येक नागरिक तेवढाच पुढाकार घेत असतो. अशाच प्रकारे कोल्हापुरातील काही युवक दर वर्षी दिवाळीच्या निमित्ताने समाजातील उपेक्षितांसाठी झटत आहेत. दिवाळी च्या निमित्ताने ते दिवाळीच्या साहित्यांचा स्टॉल लावतात आणि त्यातून मिळणारा सर्व नफा ते फक्त समाजकाऱ्यासाठी वापरतात. या वर्षीही या युवकांनी दिवाळीच्या साहित्याचा राजारामपुरीत स्टॉल लावला आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील सुशिक्षित घरातील ही सगळी उच्चशिक्षित मुले-मुली आहेत. कुणाचे वडील डॉक्टर, तर कुणाचे वडील उद्योजक आहेत. या सर्व शालेय मित्र-मैत्रिणींनी 8 वीत शिकत असताना हा उपक्रम 2015 मध्ये सुरू केला होता. 2015 पासून दरवर्षी हे सगळे एकत्र येऊन राजारामपुरीत मेन रोडवर स्टॉल लावतात. यावर्षी या युवकांनी स्टॉल लावला असून आकाशकंदील, पणती, लायटिंग आणि दिवाळीत लागणाऱ्या इतर सर्व गोष्टी ते या ठिकाणी विकत आहेत. या उपक्रमातून जमा होणारा सर्व पैसा एनजीओ आणि गरजू लोकांना ते दिवाळी निम्मित देणार आहेत. हेही वाचा : Kolhapur : महालक्ष्मी ट्रस्टची खरी दिवाळी! गरजूंना 3 हजार किलो मोफत फराळाचे वाटप, VIDEO आजपर्यंत बऱ्याच संस्थांना आणि गरजूंना पुरवली मदत आजपर्यंत या युवकांनी वेगवेगळ्या सामाजिक कारणांसाठी काम करणाऱ्या 10 हून अधिक स्वयंसेवी संस्थांना आणि काही गरजू लोकांना मदत केली आहे. स्वयं उद्योग केंद्र (मतिमंद मुलांची शाळा), पाठक अनाथाश्रम मिरज, शामकमल चॅरिटेबल ट्रस्ट (मतिमंद मुलांसाठी एनजीओ), नन्ही परी फाउंडेशन, कुष्टधाम (शेंडा पार्क), सुशीलाबाई घोडावत निवासी अंधशाळा अशा अनेक ठिकाणी त्यांनी मदत पुरवली आहे. कोरोना काळात देखील केले होते समाजकार्य कोविड साथीच्या काळात त्यांनी कोविड लॉकडाऊन दरम्यान अन्न पॅकेजचे वितरण देखील केले होते. दुर्गम गावांमधील कोविड केंद्रांना त्यांनी औषधे दान केली होती. त्याचबरोबर त्यांनी काही गरीब किवा गरजू कुटुंबांना देखील दैनंदिन साहित्य पुरवून मदत केली आहे. हेही वाचा : Diwali 2022 : कोल्हापूरकरांचा नाद ‘लय भारी’, यंदा फोडणार ग्रीन फटाके, Video स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केला होता उप्रकम आम्ही सुरुवातीला स्वतःच्या फायद्यासाठी स्टॉल लावला होता. वस्तू विकून मिळणाऱ्या पैशांनी दिवाळीसाठी फटाके घ्यायचे असे ठरवले होते. पण पुढे सामाजिक भावनेतून हा उपक्रम सुरू केला. आमच्या सर्वांच्या पालकांनीही याला प्रोत्साहन दिले. दरवर्षी आमच्या कष्टाच्या पैशातून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून त्यातून मिळणारे समाधान हीच आमची दिवाळी बनली आहे, असं ग्रुपचा सदस्य तेजस कुलकर्णी याने सांगितले. ग्रुपमधील सर्वजण करतात सहाय्य या ग्रुप मध्ये जवळपास 30 जण युवक आणि युवती आहेत. त्यांच्यात काही इंजिनीअरिंग, काही मेडिकल, काही कॉमर्स असे उच्चशिक्षण घेतलेले युवक आहेत आणि बिझनेस करत आहेत. यापैकी प्रत्येकजण आपल्या कामातून, कॉलेज मधून वेळ काढून या स्टॉल वर थांबत असतो.