कोल्हापूर, 22 ऑक्टोबर : दिवाळी म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्वाचा सण. या निमित्ताने सर्वजण आपल्या कुवतीनुसार कपडे, दागिने, नविन वस्तू खरेदी करून हा सण साजरा करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांच्या घरात फराळाचे पदार्थ बनवले जातात आणि त्या फराळाची देवाण-घेवाण करून आनंद साजरा केला जातो. एकमेकांना फराळ देणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. पण आपल्या समाजात काही कुटुंबात आर्थिक दुर्बलता, गरिबीमुळे अशा प्रकारची दिवाळी साजरी करणे शक्य होत नाही. त्यामुळे या लोकांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश देण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर मार्फत समाजातील 750 गरजू व गरीब कुटुंबांना 3 हजार किलो फराळाचे मोफत वाटप करण्यात आले आहे. काय काय होते फराळाच्या किटमध्ये ? दर वर्षीप्रमाणे या वर्षीही हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. श्री महालक्ष्मी अन्नछत्र कपिल तीर्थ मार्केट या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 750 कुटुंबातील पुरुष आणि स्त्रिया त्याचबरोबर लहान मुलं या ठिकाणी उपस्थित होते. या फराळाच्या किटमध्ये सहा जिन्नस दिले गेले. चकली, शेव, चिवडा असे तिखट पदार्थ आणि बुंदी लाडू, खाजा, शंकरपाळी असे गोड पदार्थ यामध्ये समाविष्ट होते. यावेळी प्रत्येकी 1 किलो याप्रमाणे या सर्व पदार्थांचे वाटप करण्यात आले. हेही वाचा : Diwali 2022 : कोल्हापूरकरांचा नाद ‘लय भारी’, यंदा फोडणार ग्रीन फटाके, Video दिवाळी आनंदी आणि सुखमय करण्यासाठी हा उपक्रम श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट यांच्या वतीने गेली 9 वर्ष हे मोफत फराळ वाटप सुरू आहे. यावर्षी 750 कुटुंबांना 3 हजार किलोचा फराळ मोफत देण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला होता. कोल्हापुरातील दिवाळी साजरी करू न शकणारी गरीब कुटुंबं आम्ही शोधून काढली. त्या कुटुंबांची दिवाळी आनंदी आणि सुखमय करण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला होता. 3 हजार किलो फराळाचे बाजारातील मूल्य 10 लाखांहून अधिक आहे. तर गेले महिनाभर परिश्रम घेऊन आम्ही हा उपक्रम यशस्वी केलेला आहे, असं यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले. कशा प्रकारे निवड केली गरजू आणि निराधार कुटुंबांची कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांमार्फत ट्रस्टने सर्व कुटुंबांची यादी तयार केली होती. यावेळी फराळ घेतल्यानंतर या लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.