कोल्हापूर, 21ऑक्टोबर : प्रकाशाचा सण म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे रांगोळी , दिवाळी म्हणजे आकाशकंदील आणि दिवाळी म्हणजे फटाके. फटाक्यांशिवाय दिवाळीची खरी मजा येत नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फटाके फोडण्यावर अनेक बंधने आली आहेत. पण पर्यावरणाला जास्त हानी पोहोचू नये यासाठी ग्रीन फटाके बनवण्यात आले आहेत. ग्रीन फटाक्यांचा ट्रेंड सध्या जोर धरू लागला असून कोल्हापूरच्या बाजारपेठेत हे फटाके दिवाळीसाठी विक्रीला आले आहेत. कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या बाजारपेठेत सगळीकडे हे ग्रीन फटाके मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. मोठ्या आवाजाच्या आणि धुराच्या फटक्यांपेक्षा फॅन्सी, कमी आवाजाच्या फटाक्यांना यंदा मागणी आहे. या ग्रीन फटाक्यांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या ग्रीन फटाक्यांमुळे कमी प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे ग्राहक ग्रीन फटाक्यांना पसंती देत आहेत. हेही वाचा : Diwali Shopping : लहान मुलांसाठी फक्त 300 रूपयांमध्ये मिळतात इथं ड्रेस! पाहा Video ग्रीन फटाके म्हणजे काय ? सध्या बाजारात असे फटाके उपलब्ध आहेत. ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होते किंवा होतच नाही. म्हणजेच जे फटाके पर्यावरणपूरक आहेत. त्यांना ग्रीन फटाके असे म्हटले जाते. या ग्रीन फटाक्यांमुळे नेहमीच्या फटाक्यांपेक्षा सरासरी 30 ते 40 टक्के कमी हवा आणि ध्वनी प्रदुषण होते. कोणकोणते ग्रीन फटाके आहेत उपलब्ध ? सध्या बाजारात सायरन टॉर्च, व्हीसलींग व्हील, बटरफ्लाय फोटो फ्लॅश, चिमणी तोटा, पॅरोट, फ्लॉवर पॉट, डबल आवाजाचे बॉम्ब, डीलक्स माळ, किटकॅट, भुईचक्र, फुलबाजा, गोल्डन किंवा ग्रीन स्पार्कल, चिटपूट, लसुन बॉम्ब, आपटबार आदी ग्रीन फटाके उपलब्ध आहेत. हेही वाचा : Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी झटपट पण मोठी रांगोळी कशी काढणार? पाहा Video किती रुपये आहे किंमत ? या फटाक्यांमध्ये रोल व रिंग केप बंदुका 20 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत मिळत आहेत. फटाक्यांची 1000 नगांची माळ ही 250 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत आहे. आकाशात सप्तरंगी उडणाऱ्या 15, 20, 60, 120 शॉट फटाक्यांची किंमत 300 रुपयांपासून 1200 रुपयांपर्यंत आहे. चिटपुटची किंमत ही 30 ते 35 रुपयांपासून सुरू होते. तर फुलबाजाची किंमत 20 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर पाऊस 60 रुपयांपासून 400 ते 500 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. कोल्हापुरात कुठे मिळतील हे फटाके ? कोल्हापूर शहरात पापाची तिकटी, बाजारगेट, बागल चौक, शाहूपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी विविध सजावटीच्या साहित्यांसह फटाक्यांचे स्टॉल लागलेले आहेत. या ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.