कोल्हापूर, 10 जुलै : शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे शिंदे गटात इनकमिंग वाढत आहे. दुसरीकडे शिवसेनेतून गळतीचे प्रमाण वाढलं आहे. शिवसेना नेमकी कोणाची? यावरुनही आता वाद सुरू झाला आहे. शिवसेनेनी मात्र आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. जाणाऱ्यांना अडवण्यापेक्षा नवीन लोकांना संधी देण्याचं काम करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी आता शुद्धीकरम मोहिम हाती घेतल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातून याची सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना कार्यकारणी बरखास्त शिवसेना पक्षाच्या शुद्धीकरणासाठी कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी ही घोषणा केली. सर्व कार्यकारणी आणि पदाधिकारी बरखास्त करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षाची पुनर्बांधणी करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. नवीन निवड करुन शिवसेनेला नवी बळकटी देणार असल्याचं ते म्हणाले. बैठकीत खासदार संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.
‘मातोश्री’चे दरवाजे येणाऱ्यांसाठी खुले : आदित्य ठाकरे शिवसेना फुटली असली तरीही ठाकरे अजूनही आशावादी आहेत. ‘मातोश्री’चे दरवाजे येणाऱ्यांसाठी खुले, असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले. ‘ज्यांच्यावर अधिक प्रेम केलं त्यांनी दगा दिला’ असंही आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावलं. अपात्रतेच्या कारवाईतून नाव वगळण्यावर विचारले असता माझ्यावर प्रेम करण्याची गरज नाही. शिवसेना आमची असून चिन्हही आमचेच असल्याचं आदित्य ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. दोन्ही गटाच्या आमदारांना मिळाली नवी नोटीस शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये आपला विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटांनी केला आहे. त्याचवेळी या दोन्ही गटाच्या आमदारांना एक नवी नोटीस मिळाली आहे विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी या आमदारांना नोटीस बजावली असून त्याला 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना ठाकरे गट प्रतोद सुनिल प्रभू आणि शिवसेना शिंदे गट प्रतोद भरत गोगावले यांनी एकमेकांच्या गटातील आमदारांना व्हिप बजावला होता. त्याचबरोबर आपलाच पक्ष खरा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर विधिमंडळ सचिवांनी ही नोटीस बजावली आहे. आता दोन्ही गटांना 7 दिवसांमध्ये आपली बाजू मांडावी लागणार आहे.