कोल्हापूर, 22 ऑक्टोबर : दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आणि त्यातही आपल्याकडे दिवाळीला विशेष महत्त्व आहे. आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं-चांदी खरेदी करणं शुभं मानलं जातं. या दिवशी सोनं खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे आज सकाळ पासूनच कोल्हापूर सराफ बाजारपेठेत सोनं - चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापूरची बाजारपेठ ही सराफ बाजारासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. सोन्या-चांदीचे कित्येक डिझाईन्सचे दागिने कोल्हापूरमध्ये तयार होतात आणि त्यांना प्रचंड मागणी कोल्हापूरसह, सांगली, सातारा, रत्नागिरी त्याच बरोबर कर्नाटकामधूनही असते. त्यामुळे दिवाळी निमित्ताने कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या सगळ्या सराफांनी वेगवेगळ्या डिझाईनची दागिने तयारी केलेली आहेत. हेही वाचा : Diwali 2022: कोल्हापूरकरांनी जपले सामाजिक भान, ‘या’ उपक्रमातून करणार गरिबांना मदत, Video यामध्ये नेकलेस, पाटली, बांगडी, अंगठी, तसेच कोल्हापूर डिझाईन्समध्ये कोल्हापुरी साज, ठुशी, मोहनमाळ, लिंबोणीमाळ अशा प्रकारच्या दागिन्यांचा समावेश असून धनत्रयोदशीला ग्राहकांनी खरेदी करायला सुरुवात केली, अशी माहिती कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली आहे. सोनं - चांदी भाव कमी गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 52,500/- रुपये होता. तो आज धनत्रयोदशीच्या दिवशी घसरुन 51,100/- रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा दर 62,000/- रुपयांवरून 59,000/- रुपये झाला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पाडव्याची दिवशी सुद्धा ग्राहकांना सोनं - चांदी स्वस्त दरात खरेदी करता येईल. भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांना सुद्धा खूप चांगला फायदा होईल, असंही भरत ओसवाल यांनी सांगितले आहे. हेही वाचा : Kolhapur : महालक्ष्मी ट्रस्टची खरी दिवाळी! गरजूंना 3 हजार किलो मोफत फराळाचे वाटप, VIDEO दरम्यान, दसऱ्या पासून सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीत वाढ झालेली आहे. सध्या दिवाळी असल्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोनं -चांदी खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सराफ बाजारातील व्यावसायिकांना आहे.