कोल्हापूर, 05 जानेवारी : म्हातारपण म्हणजे रिटायरमेंट नंतरचे शांत आयुष्य असे काहीसे चित्र सहसा आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असते. पण म्हातारपणात देखील तरुणांनाही लाजवेल असे काही उपक्रम करण्याचे धाडस देखील काहीजण करायला बघत असतात. असेच 72 वर्षीय दोन वृद्ध तब्बल 600 किलोमीटरचा एक सायकल दौरा करत आहेत. काय आहे उद्देश? मूळचे पुण्याचे असलेले मुकुंद कडुसकर व त्यांचे मित्र जयंत रिसबुड हे 72 वर्षांचे आजोबा घरी आराम करायच्या वयात सायकल वरून हा भलामोठा प्रवास करत आहेत. इतकं वय असून देखील निसर्गाचा आस्वाद घेत त्यांचा हा सायकल प्रवास सुरू आहे. आजच्या पिढीने व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे, आपले शरीर सुदृढ ठेवले तरच सध्याच्या परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे तरुणांसह सर्वांनाच प्रोत्साहित करण्यासाठी या सायकल भ्रमंतीला बाहेर पडल्याचे दोघा सायकल स्वारांनी सांगितले.
मुकुंद कडूसकर यांनी परदेशात प्रिंटींग मॅनेजर म्हणून काम केले आहे. तर त्यांचे मित्र जयंत रिसबुड यांनी देखील कमिन्स इंडियामधून निवृत्ती घेतल्यानंतर सायकल भ्रमंतीवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. दोघांनी सेवा निवृत्तीनंतर सायकलिंग चालू करून छोटे दौरे केले होते. पण नंतर कोकण दौरा करायचा त्यांचा विचार होता. खरंतर सुरुवातीला पुण्याहून कन्याकुमारी पर्यंतचा टप्पा त्यांनी निश्चित केला होता. पण नंतर तो पुणे ते रत्नागिरी आणि पुढे सावंतवाडी असा ठरला. त्यातही बदल होत आता हे दोघे थेट गोव्यात जाऊन दौरा समाप्त करणार आहेत. या आधी देखील त्यांनी पुणे ते उत्तर कोकण असा सायकल दौरा पूर्ण केला आहे. कसा आहे त्यांचा सायकल दौरा ? नविन वर्षात काहीतरी संकल्प करण्याच्या दृष्टीने त्यांनी 1 जानेवारीला पुण्यातून हा सायकल दौरा सुरू केला होता. त्यानंतर सातारा, कराड, कोल्हापूर असा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे. कोल्हापुरातून पुढे आंबा घाट, रत्नागिरी, कशेडी, देवगड, सावंतवाडी, गोवा असा टप्पा ते गाठतील, अशी माहिती मुकुंद कडूसकर यांनी दिली.
Kolhapur : गेली कित्येक वर्षे ‘ही’ मंडळी करतायत नदी स्वच्छतेचं कार्य, Video
ट्रेकिंगचा झाला फायदा जयंत रिसबुड यांना ट्रेकिंगची खूप आवड आहे. त्यांना गेल्या 28 वर्षांचा सह्याद्री आणि हिमालयात ट्रेकिंगचा अनुभव आहे. मी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल 90 किल्ले सर केलेले आहेत. तर 7 ते 8 वेळा हिमालय ट्रेकही केला आहे. या सगळ्याचा मला या सायकल दौऱ्यात खूप फायदा होतो, असे मत जयंत रिसबुड यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापुरकरांनी केले प्रेमाने आदरातिथ्य कोल्हापुरात दाखल झाल्यावर आम्हाला बऱ्याच लोकांनी आपुलकीने विचारपूस केली. आम्हाला काही हवं नको याची चौकशी केली. अनोळखी असताना देखील आम्हाला भेट म्हणून काही वस्तू आणि फळे देऊन आमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, असे देखील आवर्जून मुकुंद यांनी सांगितले.
Pune : आजोबांनी कमाल केली, 78 व्या वर्षी पॉवर लिफ्टिंग स्पर्धा जिंकली! पाहा Video
सायकल दौऱ्यात सेल्फ सपोर्ट वयस्कर आहे याचा अर्थ असा नाही की ताकद कमी आहे. या ताकदीच्या जोरावर सेल्फ सपोर्टने हा दौरा सुरू केला आहे. फर्स्ट एड किट, सायकलिंग किट आणि सर्व आवश्यक गोष्टी आम्ही आमच्या सोबत ठेवतो. साधारण 80 ते 100 किलोमीटरवर मुक्काम करत हा दौरा आम्ही पूर्ण करतोय, असे दोघांनी स्पष्ट केले.