मुंबई, 15 मे: अभिनेत्री केतकी चितळेच्या (Actress Ketki Chitale)अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (NCP President Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणं केतकीला चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केली आहे. यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली. कोर्टात केतकीनं वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेनं 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली.
केतकी चितळेने कवितेद्वारे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली होती. या प्रकरणी केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी कलम 500, 505 (2), 501 आणि 153 A हा गुन्हा दाखल केला आहे. केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.