मुंबई, 22 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पावसाळी अधिवेशनात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडेंना टोला लगावताना एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे करुणा शर्मा (Karuna Sharma) यांचा उल्लेख केला. यानंतर आता करुणा शर्मा थेट विधिमंडळात आल्या आहेत. विधिमंडळात करुणा शर्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कोण आहेत करुणा शर्मा? करुणा शर्मा या आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करतात. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनीदेखील गेल्यावर्षी फेसबुक पोस्ट टाकून आपण करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं कबूल केलं होतं. तसेच त्यातून आपल्याला दोन अपत्य देखील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मोठा गदारोळ झाला होता. करुणा शर्माची बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर करुणा शर्मा अनेकवेळा चर्चेत आल्या.
मुख्यमंत्री काय म्हणाले? ताट, वाटी चलो गुवाहाटी, अशा घोषणा दिल्या जात होत्या, धनंजय मुंडेही तिकडे होते. धनंजय मुंडे बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते, जसं ते कित्येक वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, पण परत परत दाखवता येणार नाही, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला.