नितीन नांदुरकर, चाळीसगाव, 24 सप्टेंबर : सोशल मीडियावर सध्या मुलं पळवणाऱ्या टोळी संबंधित चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून निष्पाप नागरिकांवर हल्ला झाल्याचा देखील प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातही अशीच काहीशी घटना समोर आली आहे. मुलं पळवण्याच्या संशयातून एका निष्पाप महिलेला चाळीसगाव शहरात काही नागरिकांनी मारहाण केलं आहे. पीडित महिलेला मारहाण करतानाचे व्हिडीओ देखील समोर आले असून ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुलं चोरणारी महिला समजून एका निराधार महिलेला नागरिकांनी चोप दिला. जळगावच्या चाळीसगावमध्ये ही घटना घडली आहे. पीडित महिलेने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने नागरिकांनी त्या महिलेवर मुलं चोरत असल्याचा संशय घेतला. मात्र त्या महिलेचा चेहरा जळालेला होता. यामुळे तिने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांनी घटनेची खातरजमा न करता कायदा हातात घेत महिलेला मारहाण केली. ( देवेंद्र फडणवीस तब्बल सहा जिल्ह्यांचे प्रमुख, पालकमंत्र्यांच्या यादीत भाजपचाच वरचष्मा ) नागरिकांनी महिलेचं काही एक ऐकून न घेता जोड्या आणि चपलांनी मारहाण केली. पोलिसांनी त्या महिलेची चौकशी करून त्या महिलेला जळगाव आशा केंद्रात दाखल केले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. चाळीसगाव शहर पोलिसांकडून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठे अशी संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता थेट पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी चाळीसगावचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “काल संध्याकाळी चाळीसगाव शहरातील सदानंद चौक या परिसरात एक महिला बुर्खा घालून फिरताना काही नागरिकांना दिसली होती. लोकांनी त्या महिलेवर संशय व्यक्त करुन त्या महिलेला पोलीस ठाण्यात आणून आमच्या स्वाधीन केली होती. आम्ही त्या महिलेची चौकशी केली असता ती महिला खंडवा येथे राहणारी आहे. तिला कुणीही नातेवाईक नसल्याने ती मिळेल त्या ठिकाणी काम करुन आपला उदरनिर्वाह भागवते. तिला राहण्यासाठी घर नसल्याने ती फुटपाथवर झोपते. आम्ही तिची संपूर्ण चौकशी करुन त्या महिलेला जळगावच्या आशा महिला वस्तीगृहात दाखल केलं आहे. मी नागरिकांना आव्हान करु इच्छितो की, अफवांवर विश्वास ठेवू नका. संशयित व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीला मारहाण न करता पोलिसांच्या स्वाधीन करा”, अशी प्रतिक्रिया के. के. पाटील यांनी दिली.