मुंबई, 30 जून : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह असलेल्या 39 शिवसेना आमदार आणि 11 अपक्षांनी बंड केलं, ज्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं, पण भाजपने राजकीय बॉम्ब फोडला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हेच सांगताना फडणवीसांनी आपण मात्र या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं सांगितलं. सत्तेत सहभागी न होण्याच्या फडणवीसांच्या या घोषणेनंतर काही तासांमध्येच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. यानंतर अमित शाह यांनीही फडणवीस या जबाबदारीसाठी तयार झाले असल्याची माहिती ट्वीटरवर दिली.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना दोन वेळा फोन केले, यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले.
काय म्हणाले फडणवीस? एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगाम, पीक पाणी, पीक विमा तसंच कोबी बाबतची परिस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला 2 जुलैला विशेष अधिवेशन बोलवून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या अधिवेशनात विधासभा अध्यक्षांचीदेखील निवड होणार असल्याची माहिती सूत्रांना दिली.