पुणे, 01 जून: मान्सूनचं (Monsoon) आगमन होण्यापूर्वीच राज्याला पूर्व मोसमी पावसानं (Pre monsoon rain) झोडपून काढलं आहे. मागील पाच दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. आजही राज्यातील बऱ्यांच जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचे ढग घोंघावत आहेत. पुढील 3 तासांत पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील (rain alert in pune) अशी माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाच्या स्थितीत घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घेण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारा वाहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या प्रतिकुल स्थितीत घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर आकाशात विजा चमकत असताना मोठ्या झाडाखाली उभं न राहाण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
त्याचबरोबर बीड, लातूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठीही पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत. पुढील तीन तासांत या जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी जवळपास 40 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या फळबागांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे वाचा- कोव्हिशिल्डचा फक्त एकच डोस दिला जाणार? लवकर लसीकरण धोरण बदलण्याची शक्यता 2 दिवसांत केरळात मान्सूनचं आगमन भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार पुढील दोन दिवसांत (3 जून) केरळात मान्सून दाखल होणार आहे. याअगोदरचं 21 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला आहे. केरळातही 31 मे पर्यंत नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता होती. मात्र दक्षिणेकडील वाऱ्याच्या स्थितीमुळे 3 दिवस उशीरा मान्सून दाखल होणार आहे.