गोंदिया, 13 जानेवारी : राज्यात वाळू उपसा बंदी घातल्यापासून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी तहसिलदारांवर ट्रॅक्टर अंगावर घातल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक नवीन घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका वनरक्षक अधिकाऱ्याला वाळूचा ट्रॅक्टर अडवल्याप्रकरणी कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
हे ही वाचा : ‘प्रेयसीचं भूत मला सतावतं..’; घाबरलेल्या प्रियकराची पोलिसांसमोर कबुली अन् अखेर 8 महिन्यांनी त्या हत्येचा उलगडा
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूचा ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या बंध्या ते खोळदा पाणंद रस्त्यावर घडली आहे. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गोपीनाथ दौलत देशमुख (55), लक्ष्मण गोपीनाथ देशमुख (30) व रणवीर नगरधने (40) असे आरोपीचे नाव आहे.
वनरक्षक सचिन पुरुषोत्तम गावंडे व त्यांचे सहकारी कर्मचारी सचिन अभिमन मेश्राम, दीपक बुद्ध सापा व लहानू सखाराम नैताम हे गस्तीवर असताना बंध्या ते खोळदा पाणंद रस्त्यावर वाळू तस्करी करताना ट्रॅक्टर अडविला. दरम्यान आरोपि गोपीनाथ देशमुख व लक्ष्मण देशमुख यांनी वाळू ट्रॅक्टर अडविल्याचा राग मनात धरून वनरक्षकांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली.
हे ही वाचा : 500 रुपयांसाठी भिकाऱ्याने गाठला क्रूरतेचा कळस; शेजाऱ्याच्या 2 वर्षीय चिमुकलीसोबत हादरवणारं कृत्य
तर वनरक्षकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली, सुमारे एक ब्रास वाळूची चोरी करून आरोपींनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्या प्रकरणी फिर्यादी वनरक्षक सचिन गावंडे (वय 33) यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी मोरगांव अर्जुनी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.