मुंबई, 4 ऑगस्ट : पत्राचाळ प्रकरणी इडीच्या (ED) अटकेत असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये इडीच्या वकिलांनी काही मुद्दे मांडले. संजय राऊतांसोबत समोरा समोर एका व्यक्तीची चौकशी करायची आहे, असं वकिलांनी कोर्टाला सांगितलं. इडीच्या वकिलांनी या व्यक्तीचं नाव घ्यायला नकार दिला, त्यामुळे याप्रकरणात नवा सस्पेन्स तयार झाला आहे. ‘आम्ही एका व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं आहे, ज्या व्यक्तीचं नाव आम्ही इकडे घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीला आणि राऊतांना समोरा समोर बसवून चौकशी करायची आहे,’ असं इडीचे वकील म्हणाले. आज झालेल्या सुनावणीमध्ये वकिलांनी आणखी काही आरोप केले. ‘प्रविण राऊत यांना मिळालेल्या 112 कोटी रकमेपैकी काही रक्कम रोख स्वरुपात मिळाली आहे. तसंच नॅशनल आणि इंटर नॅशनल प्रवासाकरताही प्रविण राऊतने राऊत परिवाराला पैसे दिले आहेत. प्रविण राऊत दर महिन्याला संजय राऊत यांना 2 लाख रुपये देत होता,’ असा दावा इडीने केला आहे. ‘काही संशयास्पद कागदपत्र जप्त केली होती, ही कागदपत्रं पैशांच्या बाबतीत आहेत, पण याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं संजय राऊत सांगत आहेत. राऊत आधीच्या चौकशीत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते, त्याची कागदपत्र त्यांच्या घरात झडतीदरम्यान सापडली आहेत. या कागदपत्रांमधून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. खूप मोठ्या रकमेचे हे व्यवहार आहेत. जवळपास 1 कोटी 8 लाख रुपयांची ही रक्कम आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यात 1 कोटी 8 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत,’ असा आरोप इडीच्या वकिलांनी केला आहे. अलिबागमधली जमीन विकत घेतली तेव्हा जमीन मालकाला 1.17 कोटी रुपये रोख दिल्याचं इडीने तपासात उघड झाल्याचं कोर्टाला सांगितलं आहे.